माढामधील उमेदवारीचा निर्णय शरद पवारच जाहीर करतील!

सामना प्रतिनिधी । मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची फळी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. दरम्यान, शरद पवार यांनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह असून माढामधून लढण्याचा निर्णय शरद पवारच जाहीर करतील, असे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात झाली. या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, रामराजे नाईक-निंबाळकर, सुनील तटकरे, विजयसिंह मोहिते-पाटील, गणेश नाईक, धनंजय मुंडे, नवाब मलिक, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

मातब्बर उमेदवार मैदानात
या बैठकीतील निर्णयानुसार माढामधून स्वतः शरद पवार, बारामतीतून सुप्रिया सुळे, मावळमधून पार्थ पवार, नाशिकमधून छगन भुजबळ, रायगडमधून सुनील तटकरे, ठाण्यातून गणेश नाईक, शिरूरमधून दिलीप वळसे-पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचे यावेळी ठरल्याचे कळते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष एकत्र सभा घेतील. 20 फेब्रुवारीला नांदेड आणि 23 फेब्रुवारीला परळी-वैजनाथ येथे एकत्रित जाहीर सभा होईल असे अजित पवार यांनी सांगितले.

चार जागा प्रलंबित
काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात जागावाटपाबाबत चर्चा झाली. रत्नागिरी, शिरूर, जालना व संभाजीनगरच्या बाबतीत चर्चा प्रलंबित आहे, पण 48 जागांवर निर्णय होण्यात काही अडचण येणार नाही. वंचित आघाडी, सीपीएम, शेतकरी संघटना इतर पक्षांचे जागावाटप झाल्यावर उर्वरित जागा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस लढतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर महाआघाडीत?
बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सामील होतील असा विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याची प्रकाश आंबेडकर यांची मागणी आहे. प्रकाश आंबेडकर यांना जे आश्वासन अपेक्षित आहे त्याचा मसुदा आम्हाला करून द्यावा. आमच्या दोन्ही पक्षाचे नेते त्यावर सह्या करून हमी देतील असे आम्ही स्पष्ट केले आहे. त्यांची अट मान्य झाल्यावर त्यांनी आमच्या सोबत यावे असा आमचा आग्रह असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?
आज लोअर परळ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित होते. यावेळी विविध जागांच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह झाला, मात्र चव्हाण यांनी त्यासाठी नकार दिला.

महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंदकेसरी होईन! जानकरांचे ‘सूचक’ उद्गार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्यानंतर आता पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने जागा सोडल्यास आपण शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहोत. ‘महाराष्ट्र केसरी’ होण्यापेक्षा ‘हिंद केसरी’ होणे जास्त आवडेल असे सांगत त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षासाठी बारामती, माढा, परभणी, हिंगोली, ईशान्य मुंबई आणि अमरावती या जागाही भाजपकडे मागितल्या आहेत.

वादग्रस्त मुद्दे वगळून मनसे महाआघाडीत
राज ठाकरे व अजित पवार यांची बैठक झाली. राज यांनी महाआघाडीत सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. जे वादग्रस्त मुद्दे आहेत ते सोडून पुढील चर्चा करू या असे मनसेचे म्हणणे आहे. काँग्रेससोबत चर्चा करून मनसेबाबत लवकरच निर्णय घेऊ, असेही नवाब मलिक म्हणाले.