सरसकट, तत्त्वतः, निकष या शब्दांमुळे संशय निर्माण होतो

4
फोटो: पीटीआय

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. निर्णयाचे आपण स्वागत करतो. पण सरसकट, तत्वत: निकष या शब्दांमुळे संशय निर्माण होतो. सरकार कर्जमाफीची अंमलबजावणी कशी करणार आणि त्यातून शेतकऱ्याला किती दिलासा मिळणार, यावरच सर्व अवलंबून असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दूरचित्रवाहिण्यांच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. हा निर्णय ऐकत असताना अल्पभूधारक किंवा बहुभूधारक असा भेदभाव करण्यात आलेला नाही. कारण ‘सरसकट’ याचा अर्थ शाळेत शिक्षकांनी शिकवितांना सांगितल्याप्रमाणे ‘सर्वांना’ असा असतो असा माझा समज आहे. सरकारनेदेखील त्याच पद्धतीने केला असावा. मात्र ते कर्जमाफीची अमलबजाकणी कशी करतात यावर सर्व अवलंबून आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. सरकार असा निर्णय घेताना अर्थमंत्रालयाची परवानगी घेत असते. त्यांनी परवानगी दिल्यावरच असा निर्णय घेता येतो, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?
कर्जमाफी केल्यामुळे शेतकरी सुखावला असला तरी त्याच्या पदरी काय पडते हे निर्णय समोर आल्यावरच कळणार आहे. जे उद्योजक आहेत आणि शेती करीत असतील तर त्यांना कर्जमाफी होऊ शकते का? हा देखील प्रश्न आहे, असे पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या