प्रामाणिकपणे काम करणार्‍यांना उद्ध्वस्त करू नका

 

नगर – सर्वसामान्यांनी उभ्या केलेल्या पतसंस्था, सोसायट्या, बँका यांचा नोटाबंदीमुळे पाया उद्ध्वस्त केला जात आहे. काळा पैसा जरूर बाहेर काढा; पण प्रामाणिकपणे काम करणार्‍यांना उद्ध्वस्त करू नका. ज्यांना नोकरी मिळाली त्यांनाही बाहेर काढले जात असून, कष्टकर्‍यांचे काम थांबणार असेल तर देशात कायदा-सुव्यवस्था राहील काय? सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी मधुकर पिचड, माजी महापौर अंकुश काकडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार दिलीप वळसे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार वैभव पिचड, आमदार संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, पांडुरंग अभंग, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी नागवडे, रावसाहेब शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी ध्येय-धोरण जाहीर करतो. सत्ता मिळाल्यावर ती कृतीत आणावी लागतात. या सरकारने नेमके काय जाहीर केले. हिंदुस्थानाबाहेरील काळा पैसा परत आणू, ते जनतेला पटले. जनतेच्या खात्यात पैसे टाकणार हेही पटले. यांनी दीड वर्ष परदेशात चकरा मारल्या. काळा पैसा येईल असे वाटले; पण मोकाळया हाताने परत आले. जर्मन सरकारने यांना लेखी दिले. आमच्याकडे हिंदुस्थानी लोकांचा पैसा आहे; पण केंद्राने याची साधी चौकशी केली नाही. बाहेरच्या देशातले वक्तव्य फसले म्हणून देशातील काळ्या पैशांचा विषय घेतला गेला. काळा पैसा निघाला पाहिजे याला आमचाही पाठिंबा आहे; पण पैसे कोठे गेला. उलट धनदांडगे सुखाने झोपत आहेत आणि गरीब लाईनीत उभा आहे. दिलेल्या आश्‍वासनाचे आता काय झाले? असा सवालही पवारांनी उपस्थित केला.

केंद्राने १५ लाख ४२ हजार कोटी जमा झाल्याचे सांगितले. रिझर्व्ह बँकेने साडेतीन लाख कोटी येणारच नाही, असे सांगितले. मग कोणता पैसा आला हे जाहीर करावे. उदयोजक व्यापारी चांगले उत्पन्न कमावतो, तर त्यातील जे कर भरत नाही त्याने ती रक्कम बाहेर काढली तर तो काळा पैसा आहे मग शेतकरी शेतमाल विकल्यावर पैसे कमावतो त्याला तुम्ही काळा पैसा म्हणता तो काय त्याने चोरी करून आणलेला नाही. देशात शेतकर्‍यांना कर नाही मग त्याला काळा पैसा कसा म्हणता येईल. सहकारी संस्था, पतसंस्था, सोसायट्या यांना निर्बंध घातले. आज त्याचे व्यवहार ठप्प झाले. राष्ट्रीयीकृत बँकेत प्रवेश मिळणेसुद्धा अवघड आहे. कधी हातही ओले करावे लागतात. नोटाबंदीनंतर पहिल्या चार दिवसांत धोरण सांगितले. राज्यात ३१ जिल्हा सहकारी बँकांमध्ये जवळजवळ ८ हजार कोटींची रक्कम जमा झाली. पण १३ तारखेला वटहुकूम काढून बँकेचे पैसे घ्यायचे नाही म्हणून ते चलन तसेच राहिले. यानंतर आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो. केंद्रातही बोललो. याअगोदर एक शिष्टमंडळ जेटलींना भेटले. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन पी. चिंदबरम यांना केस दिली व त्यांनी मागील दहा ते पंधरा वर्षांत बँकेत जे घोटाळे झाले, त्यामध्ये सहकारी बँकेच्या २४० केसेस झाल्या व साडेतीन हजार केसेस या राष्ट्रीयीकृत बँकेच्या झाल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने पैसे घेण्याचे आदेश दिले. एवढे करून सरकारने त्यानंतर न्यायालयाचे ऐकले नाही व जाचक अटी घालून समिती नेमली व ते निर्णय घेतल्यावर सरकार निर्णय घेणार आहे. मग जमा झालेल्या बँकेवर व्याजाचा बोजा कशाला? असा सवाल ही पवार यांनी केला. दरम्यान, जिल्हा बँकेच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात आम्ही येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नोटाबंदीचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला असून, बेकारी वाढली आहे. एल अ‍ॅण्ड टीने २१ हजार लोक कमी केले. अनेक कंपन्यांनी नोटिसा देऊन कारवाईला सुरुवात केली आहे. कशीबशी नोकरी मिळाली आता जर त्यांना बाहेर काढले तर कायदा सुव्यवस्था ठीक राहील का, असे परखड मतही पवार यांनी व्यक्त केले. आता सरकारला जाग आणण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी करून शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केले जाणार असून, सामूहिक शक्ती दाखविण्याचीही वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

ग्रामीण अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी रस्त्यावर उतरा
नगर जिल्हा हा डाव्या चळवळीचा जिल्हा येथे दिग्गज नेते होऊन गेले. सामान्यांचे प्रश्‍न घेऊन येथून आंदोलने झाल्यावर त्याचे पडसाद राज्यात उमटायचे; पण सध्या सर्व काही आलबेल चालू आहे. सगळे सुस्तावले आहे. जुन्या ज्या आठवणींना उजाळा देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी एकत्र येऊन आंदोलन करा, असे आवाहनही त्यांनी केले. मुलगा रडल्याशिवाय आईलाही पान्हा फुटत नाही. त्याप्रमाणे सामान्यांच्या वेदना लक्षात घेऊन रस्त्यावर उतरा, स्वस्थ बसून चालणार नाही असे ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या राजीनामा विषयात आम्ही नाही – शरद पवार
नगर – प्रत्येकाला आप आपले मत मांडण्याचा अधिकार असतो. पण आपल्याकडे अगोदर सक्षम नेतृत्व आहे का याचा ही विचार व्हायला पाहिजे. डाव्यांनी केलेल्या पतंप्रधानांच्या राजीनाम्याच्या विषयात आम्ही नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

जिल्हा बँकेत झालेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी दिलीप वळसे, मधुकर पिचड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, अंकुश काकडे आदि उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. नोटाबंदीच्या विषयावर डाव्या पक्षांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. वास्तविक नोटाबंदी संदर्भात पर्यायी व्यवस्था उभी करायला पाहिजे होती ती काय दिसून येत नाही. पण राजीनाम्याच्या विषयात आम्ही नाही असे ते म्हणाले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी श्‍वेतपत्रीका काढावी अशी मागणी केली आहे. संसदेच्या कक्षेत जे नियम आहे त्याला अनुसरुन त्यांनी मागणी केली ती योग्य आहे असे ही ते म्हणाले.

केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर जमीनी, बेनामी मालमत्ता, सोन्या प्रकरणी कारवाई करणार असे सुतवाच केले त्यावर पवार यांनी त्यांनी कारवाई हाती घ्यावी मात्र मला भाजपचे खासदार भेटल्यावर सांगतात पत्नी आणि माऊलीच्या गळयातील सोने मोजण्याची वेळ आल्यास आम्हाला पुन्हा दहा ते पंधरा वर्षे संसद बघायला मिळणार नाही. असे आपल्याकडे बोललयाचेही त्यांनी सांगितले.

ओबीसी मंत्रालयाच्या बाबतीत घेतलेला निर्णय योग्य आहे. आरक्षणाचा विषय सध्या सुरु आहे. मुस्लिम , मराठा आरक्षणाचा विचार पुढे येताना दिसला आहे. दलित आणि ओबींसीना मिळणार्‍या आरक्षण सवलतींना धक्का न लावता आरक्षण देण्यास हकरत नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भात काँग्रेसशी आघाडी करण्याबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवरच होईल. त्यांच्यातील अनेकांनी थेट वक्तव्य केले आहे. ती जनतेसमोर गेलेली आहेत. काहींना आघाडी करावी वाटते. काहींना वाटत नाही त्यामुळे स्थानिक पातळीवरच तो निर्णय होईल असे ते म्हणाले. नोटाबंदीच्या नंतर सर्वसामान्यांना जो त्रास झाला आहे तसेच संस्थाच्या संदर्भातला घेतलेला निर्णय या सर्व गोष्टी विचारात घेऊन राष्ट्रवादी पक्षाने दि.९ जानेवारी रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आपले कोणत्याही इतर पक्षांशी आंदोलनाबाबत बोलणी झालेली नाही. आम्ही ठरल्याावेळेप्रमाणे आंदोलन करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.