केंद्रात एकाधिकारशाही सुरू आहे!

सामना ऑनलाईन । कर्जत

केंद्रात सध्या एकाधिकार कारभार सुरू आहे. सत्ता स्वतःभोवती केंद्रित ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी मूठभर लोकांसाठी राज्य कारभार करीत आहेत, अशी तोफ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे डागली. लोकांना ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारमुळे देशात महागाई, महामंदी, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी वाढली असून सध्या सर्वत्र फक्त चिंतेची स्थिती आहे, असे जोरदार फटकारेही पवार यांनी लगावले.

दोन दिवस सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराचा समारोप शरद पवार यांच्या भाषणाने झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, मोदींनी देशाच्या जनतेला प्रचंड आश्वासने दिली. प्रधानसेवक म्हणून काम करेन असे चित्रही रंगवून दाखविले, पण हे सारे फसवे ठरले आहे. केंद्रात एकाधिकारशाही वाढत चालली आहे. लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. सध्या सत्ता एकाच व्यक्तीभोवती केंद्रित झाली ते धोकादायक आहे. सत्ता केंद्रित झाली की देशात काय चाललंय ते कळत नाही आणि आज मोदींचा त्याच दिशेने प्रवास सुरू आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे पवार यांनी सांगितले.

कर्जमाफीची घोषणा फसवी…
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीवरून पवार यांनी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांचा घोर अपमान केला आहे. त्यांच्या मालाला किंमत मिळत नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने कर्जमाफी केली, पण ही कर्जमाफी शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. शेतकरी लाभार्थी नसून खुर्चीत बसलेलेच खरे लाभार्थी आहेत, असे टीकास्त्र पवार यांनी सोडले.

राहुल गांधींकडे कौशल्य आहे, प्रश्न जाणून घेण्याची तयारी आहे
गांधी घराणे हे काँग्रेसला एकसंध ठेवणारा महत्त्वाचा गाभा आहे असे पवार यावेळी म्हणाले. राहुल गांधींच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडी होऊ शकते का, असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, आघाडी नेतृत्वाकडे बघून होत नाही. ती किमान समान कार्यक्रमावर होत असते. राहुल गांधींकडे कौशल्य आहे आणि त्यांची प्रश्न जाणून घेण्याची तयारीही असते. मात्र राहुल यांनी यात सातत्य ठेवावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. गुजरातमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे असेही पवार यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे सरकारच्या कारभाराबाबत नाराज
शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल मीडियात चर्चा सुरू होती. याबाबत प्रश्न विचारताच पवार म्हणाले, होय मी उद्धव ठाकरे यांना भेटलोय. ठाकरे कुटुंबाशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्या वडिलांपासून आमचा सुसंवाद आहे तो आजही कायम आहे. दहा दिवसांपूर्वी आमची भेट झाली. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे सरकारच्या कारभाराबाबत मला नाराज असल्याचे दिसले. आमची कुठलीही राजकीय समीकरणांबाबत चर्चा झाली नाही, पण शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर आम्ही कोणालाही उपलब्ध नाही, असे पवार यांनी यावेळी ठणकावून सांगितले. आम्ही फक्त समविचारी पक्षांशीच आघाडी करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२०१९ मध्ये मी पंतप्रधानही होऊ शकतो, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी केले, पण ते वास्तवाला धरून नाही. म्हणूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उगाचच स्वप्नांच्या दुनियेत वावरण्यात काहीच अर्थ नाही. – शरद पवार