अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांतदादांनी माझ्याविषयी जपून बोलावे!

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

मी १४ वेळा थेट जनतेतून निवडून आलो आहे. चंद्रकांत पाटील यांनी अजून एकदाही थेट निवडणूक लढविली नाही. ते अपघातानेच मंत्री झाले आहेत. तेव्हा त्यांनी माझ्याविषयी बोलताना जपूनच बोलावे, असा दमच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरला. जातीमधे तेढ निर्माण करण्याचे काम पवार करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता पवार बोलत होते.

सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास शरद पवार यांनी भेट दिली. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना पवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतलेला निर्णय आणि सध्याच्या भाजप सरकारच्या भूमिकेवर भाष्य केले.

मराठा समाजाला काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलेले आरक्षण तांत्रिक कारणावरून न्यायालयात रद्द झाले असले तरी ते त्यावेळी दिले होते. परंतु निवडणुकीपूर्वी १०० दिवसांत आरक्षण देणार असे म्हणणाऱया भाजप सरकारने सत्तेत येऊन चार वर्षे झाली तरी आरक्षण न दिल्यामुळेच मराठा समाजाचे आंदोलन चिघळले आहे. त्यातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानांनी आगीत तेल टाकण्याचे काम केल्यानेच राज्यात सध्या अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप करत घटनादुरुस्ती करून मराठय़ांना आरक्षण द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात बाजू मांडण्यासाठीही भाजप सरकारने प्रयत्न केले नाहीत. यातील कायदेशीर अडचणीला पर्याय असल्याचे सांगत पवार म्हणाले, केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेऊन, संसदेत मंजुरी घेतली तर मराठा, धनगर यांसह विविध राज्यांतील अशा अनेक घटकांचेही प्रश्न निकालात निघतील. लोकसभेत भाजपचे बहुमत आहे. शिवाय आपण स्वत: राजकारण न आणता हा प्रश्न सुटावा अशी विनंती इतर घटक पक्षांना करु शकतो, असेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांची विधाने आगीत तेल टाकणारी
महाराष्ट्रातील वारी ही वैशिष्टय़पूर्ण आहे. शांततेत आणि संयमाने हा सोहळा संपन्न होतो; पण या वारीत साप सोडले जातील, घातपात होऊन वेगळे घडेल असे वादग्रस्त विधान मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून झाल्यानेच लोकांच्या संतापाचा बांध फुटला. त्यातच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलने भडकाविणाऱया नेत्यांचे रेकॉर्डिंग असल्याचे सांगून संताप निर्माण केला. ही दोन्ही विधाने आगीत तेल टाकणारीच असून, रेकॉर्डिंगमधील ते नेते कोण हे जाहीर करावे, असे आवाहन शरद पवार यांनी दिले.

एक प्रतिक्रिया

  1. “त्यात चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानांनी आगीत तेल टाकण्याचे काम —–“ह्या विधानातून असा अर्थ काढता येतो तो म्हणजे आधीच कोणीतरी आग लावली आहे.कोण ते सरकार शोधून काढेलच.