लेख : शब्दांची खमंग फोडणी देणारा कवी


शरदकुमार एकबोटे

[email protected]

आपल्या वात्रटिकांद्वारे धमाल उडविणारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी आणि प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान संकुलात 

26 ऑगस्ट रोजी होत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते फुटाणे यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्त हा लेख

प्रसिद्ध वात्रटिकाकार आणि भाष्यकवी रामदास फुटाणे      यांना कमीत कमी शब्दांतून जास्तीत जास्त आशय देण्याची मार्मिक प्रतिभा लाभली आहे. खासगी मैफलमधले त्यांचे बिनधास्त किस्से, मंत्र्यांवरील मल्लिनाथी, साहित्यिकांच्या भानगडी सांगताना त्यांनी दिलेली शब्दांची फोडणी मोठी खमंग आणि झणझणीतच असते. वाचनाचा व्यासंग, विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी मैत्री, अभ्यासू  निरीक्षक शक्ती, सुबोध लेखन क्षमता आणि प्रसन्न, उत्साही व्यक्तिमत्त्व आदी अनेक वैशिष्टय़ांमुळे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय रचनाकार म्हणून मान्यता पावले आहेत.

‘सामना’, ‘सर्वसाक्षी’, ‘सुर्वंता’ अशा त्यांच्या मराठी चित्रपटांना अनेकविध पुरस्कार लाभले. कटपीस, सफेत टोपी, लालबत्ती, चांगभलं, भारत कधीकधी माझा देश आहे अशा त्यांच्या काव्यसंग्रहांना जाणकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती, मुंबई अशा अनेक संस्थांमधून त्यांनी केलेले कार्य लक्षवेधक ठरले आहे. महाराष्ट्रातील अनेक गुणी रचनाकारांना त्यांनी व्यासपीठावर आणले. कविसंमेलनांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

घसरणीला लागलेल्या नीतिमूल्यांवर भाष्य करताना यांचे शब्द स्फोटक होतात.

सरस्वतीला सोडून मोर, लक्ष्मीच्या दारी आहे,

दूरदर्शनवर केबल आलं आणि छातीला पदराचं ओझं झालं!

संपूर्ण सह्याद्री, झाडाझुडुपासह विकणे आहे

अशी जाहिरात आली की, महाराष्ट्राला जाग येईल!

प्रतिभावंतांची आजकाल, हीच मानसिकता असते

नेत्यांची जी भानगड, तीच यांची रसिकता असते!

महाराष्ट्रातील एक विचारवंत साहित्यिक अरुण साधू यांनी त्यांना आजच्या समाज संस्कृतीचे गंभीर भाष्यकार ठरवले आहे.

शेपूट घालून दुमडण्यासाठी, ध्वजस्तंभाची दोरी आहे

स्वातंत्र्य दिनी फडकण्याची, राष्ट्रध्वजालाच चोरी आहे!

या शब्दांवर जास्त बोलण्याची गरज उरत नाही. दांभिकतेची खिल्ली उडवताना रामदास फुटाणे मानवी काळजाच्या वेदनांचा कसा शोकगर्भ सूर पकडतात ते पाहण्यासारखे आहे.

हिमालयाच्या उंचीपेक्षा, भूगर्भाची खोली महान झाली

किल्लारीच्या भूकंपामुळे, जगातील दुŠखे लहान झाली!

अतिरेक्यांना भोजन द्या, कोर्टाची ऑर्डर आहे

भारतातील मशिदीपर्यंत, पाकिस्तानची बॉर्डर आहे!

कमळ, वाघ, बारामती, रुद्राक्ष, हिरवे, भगवे, निळे, बाण ऑन तू ले अशा अनेक प्रतीकात्मक शब्दातून फुटाणे बोलत राहतात तेव्हा वाचकांना आतले राजकारण उमगायला लागते. त्यांच्या शब्दांच्या धारदार शस्त्र्ाांनी राजकारणी भानावर येतात. रामदास फुटाणे यांचे हे ‘रामदासी साहित्य’ म्हणजे समकालीन वास्तवाचा मर्मदर्शक दस्तऐवज आहे. असं रा. ग. जाधव यांच्यासारख्या अभ्यासू समीक्षकाला वाटते.

हात म्हणाला बोटांना, जरा एकत्र याल का

एकविसाव्या शतकात, मला घेऊन जाल का

मूठ आवळण्याची क्रिया, केव्हाच विसरली होती

चरखा फिरवून फिरवून, बोटेही थकली होती

राजकीय अभ्यासकांची रामदास फुटाणे यांनी आपल्या भाष्यकाव्यातून चांगलीच सोय करून ठेवली आहे. तद्वत राजकीय पुढाऱ्यांना आत्मशोध घेण्याची संधीही त्यांनी दिली आहे. मुळात सगळंच भ्रष्ट, स्वार्थी राजकारण ढवळून निघालं पाहिजे. ते अंतर्मुख झालं पाहिजे हा या लेखनाचा हेतू आहे की नाही हे फुटाणेच सांगू शकतील. परंतु त्यांच्या झणझणीत लेखनाचा तेवढा प्रभाव नक्कीच जाणवतो.

सामान्य वाचकांनाही फुटाणे सहज उलगडतात. म्हणूनच त्यांची खास रामदासी शैली लोकप्रिय आहे.

कवींचा कळप घेऊन रामदासांनी महाराष्ट्रभर भटकावे असेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांना वाटते. काव्य रसिकप्रिय करण्यात आणि रसिकांची निर्मिती करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आता त्यांनी चित्रपटसृष्टीत आणखी काही करण्याची अपेक्षा मात्र जरूर आहे.

(लेखक ज्येष्ठ समीक्षक आहेत.)