चार दिवसांत सहा लाख कोटी बुडाले! ‘शेअर’वाल्या शेठजी, सटोडियांचा ‘बाजार’ उठला


सामना प्रतिनिधी । मुंबई

अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वाढत्या तणावाचे हादरे हिंदुस्थानी शेअर बाजारात बसत आहेत. या दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता असून त्याचा परिणाम जगभरातील गुंतवणूकदारांना भोगावा लागत आहे. शेअर बाजार दिवसेंदिवस पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असून मागील चार दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल सहा लाख कोटी बुडाले आहेत. परिणामी, ‘शेअर’ वाल्या शेठजी आणि सटोडियांचा ‘बाजार’ अक्षरश: उठला आहे.

मुंबईतही घसरण
गुंतवणूकदारांनी आपल्या शेअर्सची मोठ्य़ा प्रमाणावर विक्री केल्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११६ अंकांनी घसरला आणि ९ हजार ७०४ अंकांवर उघडला. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३६ अंकांनी घसरला आणि ३१ हजार १९५ अंकांवर बंद झाला.

– अमेरिका आणि उत्तर कोरिया या देशांमधील वाद अधिकच ताणला गेला आहे. त्याचा स्फोट शेअर बाजारात झाला. गुंतवणूकदारांनी आपल्या शेअर्सची विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम दिसत असून त्यामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांचे तब्बल १ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे ६४० खर्व ८५ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे.
– सध्या हिंदुस्थान आणि चीनमधील डोकलाम वादाचा फटकाही शेअर बाजाराला बसला आहे. याशिवाय सेबीने ३३१ कंपन्यांवर शेअर्सच्या व्यवहारांवर घातलेली बंदी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात आलेली मंदी इत्यादींचा परिणामही शेअर बाजारावर झाला.