कुस्तीतील डावपेचासाठी तल्लख बुद्धी गरजेची!

>>कोल्हापूर

पैलवानांना बुद्धी कमी असल्याचे आपण लहानपणापासून ऐकत आलो असलो तरी ते साफ चुकीचे आहे. कुस्तीसाठी कुशाग्र आणि तल्लख बुद्धीबरोबरच प्रतिस्पर्ध्याला चीतपट करण्यासाठी कोणते डावपेच टाकायचे याचे ज्ञानही असणे तितकेच गरजेचे असल्याचे धडे आज प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमीर खान याने येथे कुस्ती पंढरीत येऊन दिले.

बहुचर्चित ‘दंगल’ चित्रपटाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी येथील मोतीबाग तालमीत आलेल्या अमीर खानने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, कुस्ती करणे हे कोणाचेही काम नाही. तो एक प्राचीन आणि मर्दानी खेळ आहे. लहानपणी भाऊ आणि मित्रांसोबत बेडवर कुस्ती खेळायचो, पण ‘दंगल’ चित्रपटाच्या निमित्ताने सान्या मल्होत्रा, फातिमा शेख यांच्यासह आपल्याला हिंदुस्थानातील प्रसिद्ध प्रशिक्षक कृपाशंकर सिंह यांनी कुस्तीचे धडे दिल्यानंतरच कुस्तीबद्दल माहिती मिळाल्याचे स्पष्ट केले.

या खेळामध्ये स्वच्छ विचार असल्यानेच पैलवान बुद्धिवान असतात, असेही त्याने सांगितले. येणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आपला देश कुस्ती खेळात आणखी चांगले प्रदर्शन करेल, असा विश्‍वासही आमिर खानने यावेळी व्यक्त केला. यापूर्वी सरफरोश आणि मंगल पांडे चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त कोल्हापुरातील आपल्या आठवणींनाही उजाळा देत, कोल्हापूर हे खूप सुंदर शहर असल्याचेही तो म्हणाला.

दरम्यान, नोटाबंदीचा आपल्या चित्रपटावर परिणाम होणार नसल्याचे सांगत, सरकारचे हे सकारात्मक पाऊल असून, त्याला आपला पाठिंबा असल्याचेही आमिरने यावेळी स्पष्ट केले.