कथ्थक नृत्यकला म्हणजे फास्ट फुड नव्हे – शर्वरी जमेनीस

साभार - गौरव पाटील

सामना प्रतिनिधी । नांदेड

कथ्थक नृत्यकला ही आत्मसात होणारी नाही, ही कला आत्मसात करण्यासाठी श्रम करण्याची अदम्य शक्ती आणि चिकाटी आवश्यक असते. ही कला सादर करण्याची पात्रता येण्यासाठी वर्षानुवर्षे रियाझ करावा लागतो, अशा शब्दात सुप्रसिध्द कथ्थक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कथ्थक विषयी आपले मत व्यक्त केले. नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी आयोजित केलेल्या आषाढी महोत्सवात अमृतगाथा हा कार्यक्रम सादर करण्यासाठी शर्वरी नांदेडमध्ये आल्या. त्यांच्याशी बातचित केली असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.

शर्वरी जमेनीस म्हणाल्या की, आजकाल आपल्या मुलीला नृत्य प्रशिक्षणास पाठवतांना या मुलीचे आई वडिल प्रशिक्षकांना विचारतात, आमची मुलगी डांस परफॉर्मन्स किती दिवसात करेल? या पालकांना आणि या मुलींना मला इतकेच सांगायचे आहे कथ्थक नृत्यकला काही फास्ट फुड नाही, पी हळद अन हो गोरी असे व्हायला. त्यासाठी काळवेळ कशाचेही भान न ठेवता मनपूर्वक आणि चिकाटीने सराव करावा लागतो.

बिनधास्त, मी तुझीच रे, काय द्यायचं बोला या चित्रपटात अभिनय केलेल्या जमेनीस यांना विचारले की, सध्या चित्रपटात काम मिळविण्याची मुलींमध्ये भयंकर क्रेझ आहे, त्याविषयी तुम्हाला काय वाटते? या प्रश्नास उत्तर देतांना त्या म्हणाल्या, मला चित्रपटात काम करण्याची क्रेझ नाही. नृत्य हे माझे पहिले प्रेम आहे. माझ्या नृत्यनैपुण्यामुळे मला चित्रपटात काम मिळाले. त्यासाठी कोणत्याही स्पर्धेस मला तोंड द्यावे लागले नाही. नृत्यकलेत आपल्या गुरू पंडिता रोहिणी भाटे, पं.बिरजू महाराज, पं. रविंद्र गंगाली हे आपले आदर्श असल्याचे शर्वरी यांनी मुद्दाम नमुद केले.

वयाच्या सातव्या वर्षापासून नृत्याराधना आणि नृत्योपासना करणाऱ्या शर्वरी जमेनीस यांचे आतापर्यंत देशात व विदेशात असंख्य कार्यक्रम झाले आहेत. ऑस्ट्रेलिया येथील आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या ऑपेरा हाऊस मध्ये कार्यक्रम करण्याची संधी मिळविणाऱ्या ए.आर.रहेमान आणि लता मंगेशकर यांच्यानंतरच्या त्या तिसऱ्या हिंदुस्थानी कलाकार आहेत. शर्वरी जमेनीस यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असले तरी राष्ट्रीय कला अकादमीचा कलागौरव पुरस्कार शर्वरीच्या दृष्टीने महत्वाचा पुरस्कार आहे.

अवधूत गुप्ते निर्मित आणि विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ या आगामी चित्रपटात शर्वरी मावशीच्या भूमिकेत रसिकांच्या भेटीस येत आहेत. आपल्या अमृतगाथा या कार्यक्रमाविषयी बोलतांना शर्वरी म्हणाल्या की, आमदार हेमंत पाटील यांच्या पत्नी सौ. राजश्रीताई पाटील यांच्या आग्रहानुसार मी खास आषाढी महोत्सवासाठी हा कार्यक्रम तयार केला आहे. यात सर्व संत रचनांवर आधारीत नृत्ये आहेत.