शशांक शेंडे सांगणार ‘गावाकडच्या गोष्टी’

सातारा येथील ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येऊन यूटय़ुबवर ‘कोरी पाटी प्रोडक्शन’अंतर्गत तयार केलेली ‘गावाकडच्या गोष्टी’ ही वेबसीरिज बघता बघता सातासमुद्रापार पोहोचली. अल्पावधीतच तब्बल तीन लाखांहून अधिक सबस्क्रायबर मिळवणारी ही मराठीतली पहिलीच वेबसीरिज ठरली. २५ भागांनंतर या वेबसीरिजने निरोप घेतल्यानंतर पुन्हा ‘गावाकडच्या गोष्टी’ कधी पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. येत्या १३ ऑगस्टपासून ‘गावाकडच्या गोष्टी’चे दुसरे पर्व सुरू होत आहे. महत्त्वाचे म्हणजे अव्या, संत्या, सुरकी, बापू या जुन्या व्यक्तिरेखांबरोबरच आता आनंद बुवांची ही यात भर पडली आहे.

‘ख्वाडा’, ‘चिल्लर पार्टी’, ‘रेडू’ या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे हरहुन्नरी अभिनेते शशांक शेंडे यात  आनंद बुवांची भूमिका साकारत आहेत. त्याशिवाय ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेते किरण माने आणि ‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम विजय निकम हे देखील आता ‘गावाकडच्या गोष्टी’मध्ये झळकणार आहेत.