धोनीवर आरोप करणारे शास्त्रींकडून ‘क्लीन बोल्ड’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या क्रिकेट वर्तुळात सध्या माजी कर्णधार एम.एस. धोनीने टी-२०मध्ये निवृत्ती घ्यावी किंवा घेऊ नये यावरुन बरेच रणकंदन सुरू आहे. या रणकंदनामध्ये हिंदुस्थानचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उडी घेतली आहे. ‘स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून’, या मराठी म्हणीप्रमाणे रवी शास्त्री यांनी धोनीवर आरोप करणाऱ्यांना स्वत:च्या कारकिर्दीवर एकदा नजर टाकण्याचा सल्ला देत ‘क्लीन बोल्ड’ केले आहे.

हिंदुस्थानचे माजी खेळाडू अजीत आगरकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी धोनीच्या टी-२०मधील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्ला दिला होता. त्यानंतर सुरू झालेल्या वादाबाबत बोलताना शास्त्री म्हणाले की, लोकांनी धोनीच्या कामगिरीवर बोलण्याआधी आपल्या कारकिर्दीकडे एकदा नजर टाकावी. माजी कर्णधार धोनीमध्ये अजूनही क्रिकेट बाकी आहे आणि बेस्ट फिनिशरचे समर्थन करण्याची संघाची जबाबदारी आहे.

हिंदुस्थानी संघामध्ये खेळाडूंची निवड ही चांगल्या कामगिरीच्या जोरावर होते. मैदानावर धोनीपेक्षा जास्त अनुभवी आणि क्षमतेचा खेळाडू एकही नाही. यष्टीमागे त्याची कामगिरी शानदार आहे. तसेच शास्त्रींनी संघातील खेळाडूंचे कौतुक करताना म्हटले की, टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण सध्या सर्वश्रेष्ठ होत असून याच कारणामुळे आताचा संघ याआधीच्या संघांपेक्षा वेगळा ठरत आहे.