शताब्दी सगळ्यात स्वच्छ; तर दुरंतो सर्वात गलिच्छ ट्रेन


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील 77 प्रिमियम ट्रेनमध्ये पुणे -सिकंदराबाद, हावडा-रांचीसह तीन शताब्दी ट्रेन सर्वात स्वच्छ तर तीन दुरंतो ट्रेन सर्वाधीक गलिच्छ असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. तर 23 राजधानी एक्सप्रेसमधील मुंबई-नवी दिल्ली सर्वात स्वच्छ तर दिल्ली- दिब्रुगड सर्वात गलिच्छ असल्याचे उघड झाले आहे. रेल्वेने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी ‘ट्रेन क्लिननेस सर्वे 2018’ करण्यात आला होता. त्यात प्रिमियम आणि नॉन प्रमियम क्षेणीनुसार वर्गीकरण करून प्रवाशांची मते जाणून घेण्यात आली होती. त्यात 15 हजार प्रवाशांनी मानकानुसार गुण दिले. त्यात शौचालयाची स्वच्छता आणि डब्यातील स्वच्छता यानुसार गुणांकन करण्यात आले.

या सर्वेक्षणात स्वच्छतेच्या मानकानुसार रेल्वे स्थानकांचेही गुणांकन करण्यात आले आहे. मात्र, त्याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. त्यावर अजून काम करायचे असल्याचे त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. रेल्वेच्या एन्वायरमेंट अॅण्ड हाऊसकीपिंग मॅनेजमेंटद्वारे करण्यात आलेले हे पहिलेच सर्वेक्षण आहे. त्यासाठी प्रोसेस ऑडिट, डायरेक्ट ऑब्जर्वेशन आणि प्रवाशांकडून आलेली माहिती यावरून हे सर्वेक्षण करण्यात आले. शौचालयातील स्वच्छता, हाऊसकीपिंगच्या कर्मचाऱ्यांचे काम आणि त्यांचे सहकार्य, बेड रोलची स्वच्छता, पेस्ट मॅनेजमेंट, डब्यातील कचरा पेट्यांची उपलब्धता यावर प्रवाशांनी दिलेल्या माहितेच्या आधारे गुणांकन करण्यात आले. ट्रेनमध्ये शौचालयांची स्वच्छता हे खूप अवघड काम आहे. दिवसातून सुमारे 60 वेळा त्याचा उपयोग होतो. त्यामुळे वारंवार याच्या स्वच्छेतकडे लक्ष ठेवावे लागते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.