शत्रुघ्न सिन्हांनी दिले भाजप सोडण्याचे संकेत? ट्विटरवरून दिला इशारा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

प्रसिद्ध अभिनेते व भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा कायम स्वत:च्याच पक्षावर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. त्यांच्या या टीकांमुळे ते भाजप सोडणार असल्याची अनेकदा चर्चा झाली. मात्र आता थेट शत्रुघ्न सिन्हा यांनीच ते भाजप सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी शेरोशायरीतून हे संकेत दिले आहेत.

हे ट्विट करताना त्यांनी सर म्हणून कुणाचा तरी उल्लेख केला आहे. मात्र तो कुणाचा केला आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘सर संपूर्ण देश तुमचा आदर करतो. पण सध्याच्या नेतृत्वात फक्त विश्वासाहार्तेचा अभाव जाणवतो. नेतृत्व जे करतेय किंवा जे सांगतेय त्यावर लोकं विश्वास ठेवत आहेत का? कदाचित नाही. याआधी दिलेली वचनं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. कारण कदाचित यापुढे मी तुमच्यासोबत नसेन’ असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘मोहब्बत करने वाले कम ना होंगे (शायद) तेरी मेहफील में लेकीन हम ना होंगे’ अशी शायरी देखील लिहली आहे.