४२१ टाके पडूनही ती जिवंत राहिली

सामना प्रतिनिधी । वसई

इनव्हर्टर दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसलेल्या चोरट्य़ाने पैशांसाठी महिलेवर धारदार शस्त्राने असंख्य वार केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यातील श्रीप्रस्थ वसाहतीत घडली. चोरट्य़ाने इतके जीवघेणे वार केले की त्या महिलेला तब्बल ४२१ टाके पडले. परंतु देवाचीच कृपा.. इतके घाव झेलूनही ती महिला सुदैवाने बचावली आहे. या हल्ल्यात तिचे सासरेही गंभीर जखमी झाले असून दोघांवरही उपचार सुरू आहेत.

नालासोपारा पश्चिम येथे श्रीप्रस्थ वसाहत आहे. तेथील इमारत क्रमांक ३२ मध्ये मिश्रा कुटुंब राहते. इनव्हर्टर दुरुस्तीच्या नावाखाली मोहम्मद असगर ऊर्फ पप्पू हा चोरटा त्यांच्या घरात शिरला आणि त्याने प्रीती मिश्रा यांना शस्त्र दाखवून पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. प्रीती यांनी नकार देत त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करताच मोहम्मदने शस्त्राने प्रीती यांच्या तोंड, मान, हात, पाठ, पायांवर असंख्य वार केले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून घरात झोपलेले सासरे धावत आले. त्यांच्यावरही मोहम्मदने वार केले.

सेल्समनपासून सावधान…
दारावर येणारे सेल्समन आणि दुरुस्तीचा बहाणा करून घरात घुसणाऱ्या टेक्निशियनपासून सावधान, असा इशाराच पोलिसांनी दिला आहे. मोहम्मद असगर हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो सध्या मुंबईतील झोपडपट्टीत राहतो. इनव्हर्टर दुरुस्तीचा टेशियन म्हणून तो फिरतो. मिश्रा यांचे दार ठोकून इनव्हर्टर दुरुस्तीची अपॉइंटमेंट घेतली आणि लुटमार करण्यासाठी प्रीती मिश्रा यांच्यावर घाव घातले.