शीलाताई भवरे नांदेडच्या नव्या महापौर तर विनय गिरडे उपमहापौर

सामना ऑनलाईन,नांदेड

नांदेडच्या नव्या महापौर म्हणून शीलाताई भवरेंची तर उपमहापौरपदी विनय गिरडेंची निवड झाली आहे. नांदेड-वाघाळा महापालिकेच्या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला अस्मान दाखवले होते. स्पष्ट बहुमत मिळवलेल्या काँग्रेसचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होणं ही केवळ औपचारिकता म्हणून उरली होती. पण या पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती, ही उत्सुकता आज संपली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी इथे एकहाती हा विजय खेचून आणला होता. घोषित ७७ जागांपैकी काँग्रेसने घसघशीत ७३ जागांवर विजय मिळवला होता. मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी डेरा टाकूनही भाजपला केवळ ६ जागा जिंकता आल्या. शिवसेना आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व एमआयएमचा पालापाचोळा मतदारांनी उडवून लावला कारण त्यांना एकही जागा मिळाली नाही.