पं. बाळासाहेब टिकेकर

 <<शेखर गोखले>>

नुकतेच पं. बाळासाहेब टिकेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. एक कलाकार आणि रसिक या नात्याने बाळासाहेबांचे जाणे मनाला चटका लावणारेच आहे. अनेक मोठमोठय़ा गवयांपासून ते अगदी अलीकडील काळापर्यंत नवोदित कलाकारांची पुढे बसून मैफल ऐकणारा असा एक रसिक श्रोता म्हणून त्यांची आठवण कायमच सर्वांच्या स्मृतीत राहील याबाबत शंका नाही. त्यांच्या एकूणच सांगीतिक जीवनाचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, ज्यांनी जुन्या कलाकारांचे गाणे बजावणे ऐकले आहे असे फार दुर्मिळ लोक आता पाहावयास मिळतील.

असे म्हणतात की, प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते, यशस्वी स्त्राीमागे एक पुरुष असतो, पण एका अख्ख्या यशस्वी कुटुंबामागे कोण असते? या प्रश्नाचे चालते बोलते उत्तर म्हणून श्रीकृष्ण तथा बाळासाहेब टिकेकर यांचा नामनिर्देश करता येईल. पत्नी सुप्रसिद्ध गायिका सुमतीबाई टिकेकर, पुत्र अभिनेता उदय टिकेकर, स्नुषा शास्त्रीय संगीताच्या गायिका आरती अंकलीकर- टिकेकर, कन्या पं. दस्तुरांच्या शिष्या व मुंबई संगीत विभागात काम करणाऱ्या उषा देशपांडे अशी एकाहून एक नामवंत मंडळी कुटुंबात असताना आपल्या चतुरस्र कर्तृत्वाने बाळासाहेबांनी आपले वेगळेपण आणि आपले स्वत्व अबाधित राखले आहे.

पत्नी आणि सुनेच्या गायनाच्या मैफलीत त्यांनी स्वतः हार्मोनियमची साथसंगत केली. अलीकडेच त्यांची पंच्याहत्तरी झाली होती. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेहमी उत्साही होता. अखेरपर्यंत त्यांची उमेद तशीच होती. बाळासाहेबांच्या उत्फुल्ल, प्रसन्न वृत्तीतच त्यांच्या यशस्वी जीवनाचे सार एकवटले होते. बाळासाहेबांनी सुरांची साथसंगत न सोडता वकिली पेशादेखील कायम ठेवला होता.

ट्रिनिटी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा अखेरपर्यंत सांभाळताना लोकन्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही काम पाहत असत. आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांचे संगीताचे कार्यक्रम होत. परस्पर भिन्न प्रकृतीच्या क्षेत्रात काम करण्याची तारेवरची कसरत ते लीलया करीत असत. ब्राह्मण सभेने रंगमंचावर साकारलेल्या मृच्छकटिकम, संशयकल्लोळम, शाकुंतलम अशा अनेक संस्कृत नाटकांमधून त्यांनी संगीत भूमिका साकारल्या. १९६८ साली षण्मुखानंद सभागृहात झालेल्या संशयकल्लोळ प्रयोगात अश्विन शेठची भूमिका बाळासाहेबांनी वठवली होती. या प्रयोगाला उपस्थित राहिलेल्या रामूभैया दाते यांनी प्रयोग संपल्यावर बाळासाहेबांना मिठी मारून ‘‘इतका चांगला अश्विन शेठ पाहिला नव्हता’’ अशी उत्स्फूर्त दाद दिली. शब्दांची मोडतोड न होता संस्कृत नाटकांना संगीत देण्याचे अवघड कार्य त्यांनी ‘भर्तृहरीयम’ या नाटकाच्या दहा पदांना चाली देऊन केले. मोगूबाई कुर्डीकर, रामभाऊ मराठे, रत्नाकर पै, प्रभा अत्रे अशा अनेक मान्यवर गायक-गायिकांच्या कार्यक्रमात त्यांनी हार्मोनियमची साथ केली. १९५८ साली भास्करबुवा बखले यांनी गिरगाव येथे स्थापन केलेल्या ट्रिनिटी क्लबमधे ते सहभागी झाले व १९६७ पासून शेवटपर्यंत ते या क्लबचे काम पाहत होते. हा ट्रिनिटी क्लब म्हणजे गायन-वादन क्षेत्रातील हौशी मंडळींची पंढरीच असून मोगूबाई कुर्डीकर, बालगंधर्व, कुमार गंधर्व यांसारखे मान्यवर कलावंत या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आज या क्लबमध्ये सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांत नवोदित गुणवंतांना रियाझाची व गायनाची संधी मिळत असते.

‘विनाविलंब न्याय’ या संकल्पनेमुळे लोकप्रिय झालेल्या लोकन्यायालयामध्ये स्थापनेपासून अखेरपर्यंत बाळासाहेब टिकेकर न्यायाधीश म्हणून सक्रिय सहभागी झाले. मुख्यत्वेकरून वाहनांच्या अपघातासंबंधीचे खटले या न्यायालयात चालविण्यात येतात व अल्पावधीत संबंधितांना योग्य न्याय मिळतो. पक्षकाराच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला उदंड समाधान देतो असे पं. बाळासाहेब आवर्जून नमूद करीत.

(ट्रिनिटी क्लबचे सचिव)