पोलिसाची अभिनेत्रीवर आक्षेपार्ह कमेंट; पोलिसांत तक्रार दाखल


सामना ऑनलाईन । मुंबई

‘कुमकुम भाग्य’ या प्रसिद्ध मालिकेतील आलीया म्हणजेच अभिनेत्री शीखा सिंगने तिच्या इन्स्टाग्राम अकाउन्टवर केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे एका पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

शिखा सिंगने कुमकुम भाग्य या मालिकेचे एक हजार एपिसोड पूर्ण झाल्यानिमित्त पार्टी करण्यात आली. यावेळी शीखाने पती करण शहासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोला अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली असून चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मात्र एका आरटीओमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने शीखाच्या फोटोवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली. ‘कृपया तुमचे बिकनी किंवा मायक्रोमिनीमधले हॉट फोटो नवीन वर्षाचे गीफ्ट म्हणून अपलोड करा’ अशी कमेंट त्या पोलीस अधिकाऱ्याने केली. शीखाने या पोलीस अधिकाऱ्याबद्दल तक्रार दाखल केली असून त्याच्यावर कडक कारवाई करावी असे म्हटले आहे. संपूर्ण प्रकरणात त्या अधिकाऱ्याला त्याच्या राहत्या घरुन पकडण्यासाठी पोलिसांनी मदत केली असल्याचेही शीखाने म्हटले आहे.

आमच्या मालिकेतील प्रतिमेविषयी नेहमीच द्वेषाने भरलेले ईमेल येत असतात. ते ईमेल आमच्या सवयीचेच झालेले आहेत. परंतु या अशा विकृतीबद्दल बोलण्याची आमची नैतिक जबाबदारी असल्याचे तिने सांगितले. आम्ही ग्लॅमर क्षेत्रात असल्याने आमच्यावर शेरेबाजी करणं हे लोकांना जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखं वाटतं. अनेक स्त्रिया या घटनांविषयी बोलत नाही, पण सेलिब्रिटी म्हणून यासारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं चुकीचं असून त्याविषयी आवाज उठवणे आमची जबाबदारी आहे. मी उचलेलं हे पाऊल इतर स्त्रियांना अशा गोष्टींविरोधी बोलण्यासाठी प्रोत्साहन देईल असेही तिने म्हटले आहे. माझा लढा हा फक्त त्या माणसाबद्दल नाही तर समाजातील विकृत विचार करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेविरुद्ध आहे. जे लोक अशा अनुभवांना सामोरे गेले आहेत त्या सर्व महिला आणि पुरुषांनी या विषयी आवाज उठवावा असे आव्हानही तिने केले आहे.