लंकेविरुद्ध शतकी खेळीसह धवनचा ‘अनोखा’ विक्रम

सामना ऑनलाईन । पालेकेले

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात सुरू असलेल्या पालेकेले कसोटीदरम्यान पहिल्या दिवशी शिखर धवनने शतक झळकावले. शिखर धवनने १२३ चेंडूत १७ चौकारांसह ११९ धावांची जबरदस्त खेळी केली. धवनची मालिकेतील ही दुसरी शतकी खेळी आहे. विदेशामध्ये हिंदुस्थानच्या सलामीवीराने एकाच कसोटी मालिकेमध्ये दोन शतके झळकावण्याची २०११ नंतरची ही दुसरी वेळ आहे.

धवनच्या आधी हिंदुस्थानच्या ‘द वॉल’ राहुल द्रविडने २०११मध्ये इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. द्रविडने सलामीवीराची भूमिका पार पाडताना एकाच कसोटी मालिकेमध्ये दोन शतके झळकावली होती. विदेशामध्ये हिंदुस्थानकडून एकाच कसोटी मालिकेत दोन शतके झळकावण्याचा पराक्रम ७ खेळाडूंनी केला आहे. यात लिटल मास्टर सुनील गावसकर आघाडीवर आहेत.

धवनने कसोटीमधील सहाव्या शतकासह आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. शिखर धवन हिंदुस्थानचा पहिला डावखूरा सलामीवीर आहे ज्याने विदेशात ५ कसोटी शतक ठोकली आहेत. तसेच श्रीलंकेमध्ये तीन कसोटी शतक झळकावर वीरेंद्र सेहवाग आणि पुजाराच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे.

विदेशात एका मालिकेत दोन शतके झळकावलेले खेळाडू

सुनिल गावसकर – ५ वेळा
राहुल द्रविड – २ वेळा
विनु मंकड – १ वेळा
रवी शास्त्री – १ वेळा
गौतम गंभीर – १ वेळा
वीरेंद्र सेहवाग – १ वेळा
शिखर धवन – १ वेळा (श्रीलंका कसोटीतील पहिल्या डावापर्यंत)