पगार न मिळाल्याने शिर्डीतील प्रसाद लाडू बनविणाऱ्यांचे ‘काम बंद’

सामना ऑनलाईन, शिर्डी

दोन महिन्यांपासूनचा पगार न मिळाल्याने साईबाबा संस्थानमधील लाडू बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रसाद लाडू बनविण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे संस्थानने लाडूविक्री बंद केल्याने साईभक्तांना लाडू प्रसादाविनाच परतावे लागत आहे.

नाशिक येथील यशोधरा महिला औद्योगिक संस्थेने साईबाबा संस्थान व्यवस्थेकडून लाडू तयार करून त्याची पॅकिंग करण्याचा ठेका घेतला आहे. यासाठी शेकडो कर्मचारी रात्रंदिवस येथे राबत आहेत, मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीने या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन अदा केले नाही. वेळोवेळी मागणी करूनही ठेकेदाराकडून आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी बुधवारी काम बंद करण्याचा निर्णय घेऊन ठेकेदाराविरोधात प्रसादालयासोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. साईबाबांच्या दरबारी आलेला प्रत्येक भाविक परत जाताना प्रसाद लाडूचे एक पाकीट घेऊनच जातो. दिवसेंदिवस या प्रसादाची मागणी वाढत असून यासाठी साईबाबा संस्थानमध्ये स्वतंत्र विभाग आहे. बुंदी तयार करून तिचे लाडू बनवणे, तसेच त्याचे पॅकिंग करण्याचे काम संस्थान ठेकेदाराकडून करून घेते तर विक्रीचे काम संस्थानच्या माध्यमातून चालते.

प्रसादाच्या प्रतीक्षेत भावीक
या आंदोलनामुळे प्रसादालयात मोठय़ा प्रमाणात बुंदी तयार असून तिचे पॅकिंग न झाल्याने सध्या लाडू काऊंटरवर विक्रीसाठी लाडू पॅकेट उपलब्ध नाहीत. त्यामुळे साईभक्तांना प्रसादाविनाच परतावे लागत आहे. लाडू प्रसाद मिळेल या अपेक्षेने अनेक भक्त ताटकळत उभे पाहून लाडूविक्री सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. हातावर काम करून पोट भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या संस्थेवर संस्थान काय कारवाई करणार याकडे साईभक्तांचे लक्ष लागले आहे.