Pulwama शहिदांच्या कुटुंबीयांना शिर्डी संस्थानकडून 2.51 कोटींची मदत

सामना प्रतिनिधी । नगर 

जम्‍मू व काश्‍मीरच्‍या पुलवामा जिल्‍ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्यामध्‍ये 40 जवान शहीद झाले. या शहीद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्‍तांच्‍या व श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या  वतीने 2.51 कोटी रुपयांची मदत निधी देणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.

डॉ.हावरे म्‍हणाले, “जम्‍मू व काश्‍मीरच्‍या पुलवामा जिल्‍ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्‍या भ्‍याड हल्‍ल्यामध्‍ये 40  जवान शहीद झालेले आहेत. या घटनेचा सर्व स्‍तरातून संताप व निषेध व्‍यक्‍त केला जात आहे. या हल्‍ल्याला देशाचे सैन्‍य आणि शासन उत्‍तर देईलच पण आपल्‍या संवेदना सर्व देशाने व्‍यक्‍त केलेल्‍या आहेत आणि त्‍या संवेदनाचा आदर श्री साईबाबा संस्‍थान करत आहे. त्‍या संवेदना व्‍यक्‍त करुन या हल्‍ल्यात शहीद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्‍तांच्‍या व श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने 2.51 कोटी रुपयांचा निधी देण्‍या संदर्भात मी संस्‍थानच्‍या सर्व विश्‍वस्‍तांची चर्चा केली आहे.” मा.उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयास व शासनाच्‍या परवानगीस अधिन राहुन सदरचा निधी देण्‍यात येईल असे ही डॉ.हावरे यांनी सांगितले. यापूर्वी सिद्धिविनायक न्यासानेही शहीदांच्या कुटुंबीयांना 51 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.