आई पण बदलली?

5

>> शिरीष कणेकर

पाच वर्षांच्या मुलीच्या मस्तीला वैतागून तिच्या आईनं तिला मेणबत्तीनं चटके दिले. पनवेलला घडलेल्या या घटनेची बातमी वृत्तपत्रांनी दिली आहे. मुलीचे भाजीविक्रेते वडील घरी परतल्यावर जखमी मुलीनं घडला प्रकार त्यांना सांगितला. ते थेट पोलिसात गेले. मुलीची आई व या दुष्कृत्यात तिला मदत करणारी तिची काकू यांना पोलिसांनी अटक केली.

शतकानुशतके चालू असलेली नाती एवढी बदलायला लागली. दंगामस्ती करणाऱ्या मुलीचा आईला राग आला असेल तर तिनं मुलीच्या पाठीत धपाटा घालायचा. दोन घालायचे. तेवढय़ानेही भागत नसेल तर तिचा करकचून गालगुच्चा घ्यायचा, पण पाच वर्षांच्या चिमुरडीच्या सर्वांगाला मेणबत्तीनं चटके द्यायचे? अन् हे अघोरी कृत्य करतं कोण तर जन्मदात्री आई. बरं, एक चटका देऊनही तिचा जीव शांत झाला नाही. ती चटके देतच राहिली. आई जर या थराला जाते तर काकूचं काय बोलायचं, पण तीही एक स्त्रीच होती नं? तीही द्रवली नाही? आईला परावृत्त करायचं सोडून तीही या भयंकर प्रकारात सहभागी झाली?

बाकी सगळ्या नातेसंबंधांत होत असलेली गडबड, पडझड आपण उघडय़ा डोळ्यांनी इतके दिवस पाहत होतो आणि अवंढय़ाबरोबर सगळं गिळत होतो. पैशांसाठी मुलगा सख्ख्या बापाचं डोकं फोडत होता. बापाचं? पैसा एवढा मोठा कधी झाला? आईबापांना देव्हाऱ्यात बसवायचं अशा विचारांचे आम्ही. त्यातल्या कुणाचा जीव घेण्याची कल्पना आमच्या पचनी कशी पडावी? जिवाचा तडफडाट होतो. कुठं चाललोय आपण?

अन् आता ही आई. चिमुकल्या मुलीला मस्ती करते म्हणून मेणबत्तीचे चटके देत सुटते? आई आणि तिची माया याबद्दल काय काय वाचल्यावर, ऐकल्यावर व पाहिल्यावर आज आईचं हे रूप बघायला लागतंय. आईच जर इतकी अमूलाग्र बदलू शकते तर राहिलं काय? मानवजातीची बैठकच विस्कटली. आईचं निःस्वार्थी प्रेम निरंतर नाही तर दुसरं काय आहे? काहीच नाही. हा विचार थरकाप उडवितो. पूज्य, निर्मळ, पवित्र अशी गोष्टच जगात आता राहिलेली नाही? माझ्या मनात राहून राहून येतं की जगाच्या विनाशाची तर ही चिन्हे नव्हेत? लेकीकडून घडल्या गोष्टी कळल्यावर बाप तत्काळ पोलिसात गेला ही गोष्टही पुरेशी सूचक आहे, बोलकी आहे. भविष्यावर प्रकाश टाकणारी आहे.
[email protected]