जागेच्या वादातून तरुणाला मारहाण, वडिलांना रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । शिरोळ

शिरोळ तालुक्यातील गौरवाड येथील घर जागेच्या वादातून उमेश आयवळे या युवकाला मारहाण करून त्याचे वडील शामराव आयवळे यांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी बसवराज आप्पासाहेब पाटील व आप्पासाहेब इराप्पा पाटील (दोघे रा.गौरवाड ता.शिरोळ) यांना आज कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरूद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश आयवळे याने कुरुंदवाड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादिनुसार, आठ वर्षांपूर्वी शामराव आयवळे यांनी राहत असलेली घराची जागा संशयीत आरोपी आप्पासाहेब पाटील यांच्याकडून विकत घेतली होती. ५० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर तसा करारही झाला होता. ही जागा नावावर करून द्यावी अशी मागणी शामराव आयवळे सतत पाटील यांच्याकडे करत होते. मात्र पाटील यांनी ३० हजार रुपये घेऊन जागा सोडून दे अशी धमकी देत त्यांचा मुलगा उमेश याला मारहाण केली. तसेच घरातील साहित्याची मोडतोड करून १० हजार रुपयांचे नुकसान केले. एवढेच नाही तर शामराव आयवळे यांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अमोल कुंभोजे याला तातडीने अटक करुन त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवा अशी मागणी डीपीआयचे जिल्हाध्यक्ष सतीश भंडारे व शाहिर आवळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.