शिरूरमध्ये पाणीबाणी, देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

3

सामना प्रतिनिधी । शिरूर

कुकडी नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे कोरडे ठणठणीत पडल्याने शिरूर तालुक्याच्या बेट भागातील कुकडी किनारी असलेल्या अनेक गावांत पाणीटंचाईचे फारच मोठे संकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान टाकळी हाजी व निघोज येथील मळगंगा मातेचा फार मोठा यात्रोत्सव पुढील आठवड्यात आहे. संपुर्ण राज्यभरातून या यात्रेला भाविकांचा महापूर लोटणार असून कुकडी नदी कोरडी ठणठणीत पडल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेवून कुकडी नदीला पाणी सोडण्याचे नियोजन करावे अशी मागणी शिरूर व पारनेर तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे.

पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारी टाकळी हाजी (पुणे) व निघोज (नगर) या गावांच्या सरहद्दीवरुन कुकडी नदी वाहत आहे. याच ठिकाणी जगप्रसिध्द असणारे राजंणखळगे असून नदीच्या दोन्ही तीरांवर नगर व पुणे जिल्ह्याच्या हद्दीत मळगंगा मातेची भव्य अशी मंदीरे आहेत. मळगंगा देवीची यात्रा २६ एप्रिलपासून सुरु होत आहे. देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक या यात्रेसाठी येत असतात. परंतु चालू वर्षी दुष्काळाची छाया तीव्र असल्याने कुंडपर्यटन स्थळावरील बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे, तर विहिरी देखील आटल्या आहेत. तसेच रांजणखळगे पाण्याविणा  कोरडे ठणठणीत पडल्याने पर्यटकांना देखील या रांजणखळग्यांचा मनमुरादपणे आनंद लुटता येणार नाही.

आगामी काळात होत असलेला मळगंगा देवीचा यात्रोत्सव व  पुणे  व नगर जिल्ह्यातील कुकडी नदी किनारी असलेल्या ग्रामस्थांची कुकडी नदीला पाणी त्वरित सोडावे अशी मागणी टाकळी हाजी व  निघोज ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.