पारनेरकरांवर मोठा अन्याय,पाण्यासाठी तीव्र संघर्ष

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील टाकळी हाजी परीसरातील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. कुकडीचे अधिकारी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता जुन्नर तालुक्याला झुकते माप देउन शिरूर तालुक्यातील जनतेवर अन्याय करण्याची भूमिका घेत असून त्यांची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी पाणी प्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिला आहे.

परिसरातून जाणाऱ्या मीना कालव्याला पाणी सोडताना अगोदर जुन्नर तालुक्यात पाणी सोडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. प्रत्यक्षात जुन्नर तालुक्यात पाणी सोडताना कुकडी नदीला पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समीतीत घेतला गेला होता. या बैठकीला जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, श्रीगोंदा आमदार राहुल जगताप आदी तसेच कुकडीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त असताना कुकडीच्या अधिकाऱ्यांनी जुन्नर तालुक्यासाठी कुकडी नदीला पाणी सोडले असून हे पाणी फक्त पारनेर तालुक्यातील रेनवडी पर्यंत येणार असल्याची माहिती मिळत आहे. याचा लाभ फक्त जुन्नर तालुक्याला होणार असून कुकडी नदी किनारी असणारी पारनेर व शिरुर तालुक्यातील बहुसंख्य सगळीच गावे वंचित राहणार आहेत. सध्या या गावातील जणावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील अत्यंत गंभीर बनला आहे.

गेली पाच वर्षे शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. फळबागा पाण्याअभावी जळल्या आहेत. शेतकऱ्यांची फार मोठी आर्थिक हानी झाली आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने या दोन्ही तालुक्यातील शेतकरी दूधउत्पादन मोठय़ा प्रमाणात घेत असून आता फक्त त्याच व्यवसायावर प्रापंचिक गाडा हाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. अडचणीत अडचण म्हणजे सध्याच्या तीव्र पाणी टंचाईच्या काळात आज दुभत्या जनावरांना प्यायला पाणी नाही की खायला चारा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही सर्व परिस्थिती कुकडी अधिकाऱ्यां सहीत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे. असे असताना फक्त कुकडी नदीला जुन्नर तालुका पुरतेच मर्यादित पाणी सोडून हे अधिकारी कुकडी कालवा सल्लागार समीतीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला हरताळ फासण्याचे काम करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. पारनेर व शिरूर तालुक्यातील कुकडी नदी गावाकाठच्या जनतेचा घोर अपमान आहे. या जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम हे अधिकारी करीत असून त्यांच्या निर्णयाचा निषेध म्हणून या गावातील जनता तिव्र आंदोलन करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहाणार आहे असा इशारा माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिला आहे.