कळमनुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे अजय सावंत

सामना प्रतिनिधी । कळमनुरी

कळमनुरी येथील पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अजय सावंत उर्फ गोपु पाटील हे विजयी झाले आहेत. काँग्रेसकडे पूर्ण बहुमत असतानाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जबरदस्त व्युहरचना आखत शिवसेनेकडे विजयश्री खेचून आणली. त्यामुळे काँग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे आणि खासदार राजीव सातव यांना जबरदस्त झटका बसला आहे. काँग्रेसच्या सभापतीसह पाच सदस्यांनी गैरहजर राहत मतदानावर बहिष्कार टाकला असून तीन अपक्षांनी शिवसेनेला साथ दिली.

कळमनुरी पंचायत समितीचे काँग्रेसचे उपसभापती चंद्रकांत डुकरे यांनी काही दिवसापूर्वी पदाचा राजीनामा दिल्यामुळे सोमवारी नुतन उपसभापती निवडीसाठी उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली. या पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे १३, शिवसेनेचे ६ व तीन अपक्ष असे एकूण २२ संख्याबळ आहे. सकाळी १० वाजेपासुन सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेत उपसभापती पदासाठी शिवसेनेचे पंचायत समितीचे गटनेते अजय सावंत उर्फ गोपु पाटील, विजय गंगेवार, काँग्रेसचे श्रीनिवास मुंडे यांनी उमेदवारी दाखल केली. शिवसेनेचे विजय गंगेवार यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्यावर सावंत व मुंढे यांच्यात थेट लढत झाली. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानामध्ये शिवसेनेचे सावंत यांना ९ तर काँग्रेसचे मुंडे यांना ८ मते मिळाली. दरम्यान, काँग्रेसच्या विद्यमान पंचायत समिती सभापती विजया जनार्धन पतंगे यांच्यासह गोकर्णाबाई मस्के, पंचफुला बेले, आशाबाई घुमाळ, आशाबाई काळे हे पाच काँग्रेस सदस्य गैरहजर राहिले. शिवसेनेचे अजय सावंत हे उपसभापती पदावर विजयी झाल्याची घोषणा पिठासीन अधिकाऱ्यांनी केल्यावर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतीषबाजी करत एकच जल्लोष केला.

दरम्यान, नवनिर्वाचीत उपसभापती अजय सावंत यांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासह शिवसैनिकांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी प्रकाश नरवाडे, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, बाजीराव सवंडकर, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, शहरप्रमुख संतोष सारडा, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, भानुदास जाधव, नंदकिशोर खिल्लारे, माजी जि.प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, राजेंद्र शिखरे, डॉ. वसंतराव देशमुख, रावसाहेब सावंत, फकीरा मुंडे, राम कदम, युवासेनेचे मयुर शिंदे, कांता पाटील, रुस्तुम दांडेकर, अ‍ॅड. रवी शिंदे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पतंगे, मनोरमा संजय मंदाडे, अनिता शिवाजी भुरके, गायत्री साहेबराव जाधव, विजय गंगेवार, डॉ. वसंतराव देशमुख यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Summery – Ajay Sawant elected as a deputy speaker of kalamnuri panchayat samiti