मराठी शाळा बंद करण्याचा डाव शिवसेनेने हाणून पाडला

सामना प्रतिनिधी । मुंबई

पटसंख्या घटल्याचे कारण देत आठ मराठी शाळांसह तब्बल १६ शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा डाव शिवसेनेने जोरदार विरोध करीत हाणून पाडला. या शाळा बंद करण्यापेक्षा चांगल्या सुविधा द्या आणि पटसंख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करा, असे सक्त निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी प्रशासनाला दिले. मराठी शाळा बंद करू नयेत या शिवसेनेच्या मागणीला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यामुळे हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला.

येत्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांबरोबरच उर्दू, गुजराती, तेलगू भाषेच्या शाळा विद्यार्थी संख्या घटल्याने बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण समितीत मांडला. यामध्ये दादर, परळ, वडाळा परिसरांतील आठ मराठी शाळांसह मुंबईभरातील शाळांचा समावेश आहे. या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी झाल्यामुळे या शाळा बंद करून पालिकेच्या जवळच्या शाळेत त्यांचे विलीनीकरण करण्यात येण्याचा हा प्रस्ताव होता. मात्र प्रशासन जाणीवपूर्वक शाळा बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सचिन पडवळ यांनी सांगितले. दुरुस्तीच्या नावाखाली शाळांचे स्थलांतर करून कालांतराने त्या बंद करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. शिक्षण समिती सदस्यांशी चर्चा न करता थेट शाळा बंद करण्याचा प्रस्ताव कसा आणला, असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला. आतापर्यंत बंद केलेल्या शाळांचा अहवाल प्रशासनाने सादर करावा, अशी मागणी स्नेहल आंबेकर यांनी केली.

पटसंख्या वाढवा, सोयीसुविधा द्या!
पालिकेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याची जबाबदारी संबंधित शाळांमधील शिक्षकांचीही असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी सांगितले. त्यामुळे अशा शाळांच्या घटलेल्या विद्यार्थी संख्येचे सर्वेक्षण करून जबाबदारीही निश्चित करा, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना २७ वस्तू मोफत दिल्या जातात. मोफत ‘बेस्ट’ प्रवासही दिला गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सोयी उपलब्ध करून द्या, पण मराठी शाळा बंद करू नका असे त्या म्हणाल्या.