आमचा शेतकरी गुन्हेगार नाही, शिवसेना कर्जमुक्ती मिळवून देणारच- आदित्य ठाकरे

20
aaditya-thackeray-latur


सामना प्रतिनिधी । लातूर

‘शहरामध्ये मोठमोठाली होर्डिंग लावून कर्जमाफीचा डांगोरा पिटला जात आहे. प्रत्यक्षात कोणाचे 17 रुपये माफ होतात तर कोणाचे 13 रुपये माफ होतात. बँका शेतकर्‍यांना दारात उभे करत नाहीत. आमच्या शेतकरी काही गुन्हेगार नाहीत त्यामुळे आम्हाला कर्ज माफी नाही तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती हवी आहे. शिवसेना संपूर्ण कर्जमुक्ती करणारच’, असे ठाम प्रतिपादन शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

औसा तालुक्यातील मौजे चलबुर्गा, बुधोडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. मला विद्यार्थ्यांनी दुष्काळाचे चित्र भेट दिले सबंध महाराष्ट्रात अशी दुष्काळी परिस्थिती आहे पाऊस नाही पण केवळ अश्रूंचा पाऊस पडत आहे. या भागात अरबी ची पेरणी झाली नाही असे सांगण्यात आले. मी तर शहरी बाबू आहे पण शिवसैनिक म्हणून मी तुमच्या संकटात तुमच्या सोबत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘स्वतःचे बरे वाईट करून घेण्याचा विचार मनात आणू नका असा विचार मनात आला तर शिवसेनेच्या आठवण काढा शिवसेना तुमच्या मदतीसाठी उभी राहील. आज पर्यंत मार्च-एप्रिलमध्ये दुष्काळ येत होता आता मात्र ऑक्टोबरपासूनच दुष्काळ परिस्थिती निर्माण होते आहे. दुष्काळ कितीही गंभीर असू द्या शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील’ असा विश्‍वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी लोकांना दिला.

‘तुम्ही कोणत्याही पक्षाचे असो कोणालाही मतदान करणारी असा दुष्काळात चिंता करू नका घाबरू नका तुमच्या संकटात शिवसेना खंबीरपणे तुमची सोबत करेल. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली आहे’, असे त्यांनी सांगितले.

‘दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पशुखाद्याचे वाटप करत आहे. पाण्याच्या टाक्यांचे वाटप करत आहे. शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न आम्ही लावून देत आहोत. तुम्ही हात मारली तर तुमच्या मदतीला शिवसैनिक निश्चितपणे इतर कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही’, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या