उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

सामना प्रतिनिधी । मुंबई

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची लोकायुक्तांमार्फत तर उद्योगमंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांची स्वतंत्रपणे निःपक्षपातीपणे चौकशी करण्याची घोषणा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्यानंतर आज सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला, पण त्यांनी तो फेटाळला.

देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची सकाळी भेट घेतली तेव्हा त्यांनी देसाईंचा राजीनामा स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. ‘एमआयडीसी जमीन प्रकरणात काहीही गैर घडलेले नाही. तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणार आहे, ती होऊ द्या,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि देसाईंचा राजीनामा स्वीकारणार नाही याबद्दल माहिती दिली. चौकशीच्या काळात मंत्रीपदावर आपण राहू नये असे वाटले म्हणून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देऊ केला, पण तो त्यांनी स्वीकारला नाही. आता चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार व येणारे निष्कर्ष मान्य करणार असे देसाई यांनी सांगितले. एमआयडीसीचे प्रकरण हे राजेंद्र दर्डा आणि नारायण राणे या दोन माजी उद्योगमंत्र्यांच्या काळातील असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.