तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून रिफायनरी विरोधात शिवसेनेचा निषेध मोर्चा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

कोकण भस्मसात करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना हद्दपार करण्याची जिद्द मनाशी बाळगून पेट्रोकोमिकल रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना शुक्रवारी रस्त्यावर उतरली. शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तोंडाला पट्ट्या बांधून शिवसेना शाखा साळवी स्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान लाँग मार्च काढला. पेट्रोकोमिकल रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात फलक हातात आणि शिवसेनेचा भगवा हातात घेऊन शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले.

शिवसेना शाखा साळवी स्टॉप येथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी विरोधात आज रस्त्यावर उतरली आहे. हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. आम्हाला अरामको पण नको आणि प्रकल्प आणणारे हरामखोर दलाल पण नको, अशा शब्दात खासदार राऊत यांनी प्रकल्पाविरोधातील संताप व्यक्त केला.

या आंदोलनात रिफायनरी विरोधी शेतकरी-मच्छिमार कृती समिती आणि नाणार प्रकल्पग्रस्तही सहभागी झाले. शिवसैनिक, शेतकरी, मच्छिमार तोंडाला काळ्या पट्ट्या लावून प्रकल्पाचा जोरदार निषेध केला. या मोर्चात शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, आमदार राजन साळवी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, प्रकाश कुवळेकर, जिल्हा महिला संघटक शिल्पा सुर्वे, जि. प. अध्यक्षा स्वरुपा साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडीत, सभापती सहदेव बेटकर, अभिजीत तेली, माजी सभापती दिपक नागले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.