जनतेची सेवा करा, हिच शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिलीय – खासदार हेमंत पाटील

184

सामना प्रतिनिधी । हिंगोली

निवडणुकीत मतदार हा राजा असतो व निवडणूक झाल्यावर निवडून येणारा राजा बनतो. मात्र, माझ्यासाठी 5 वर्ष मतदार राजाच राहणार असून सेवक म्हणून मी प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी केले. मतदारसंघातील कुठलीही समस्या थेट माझ्यापर्यंत पोहचवा, ती सोडविण्यासाठी शासन व प्रशासनातील दुवा म्हणून भुमिका पार पाडणार असल्याचेही खासदार पाटील यांनी हिंगोली येथील कृतज्ञता सोहळ्यात बोलतांना सांगितले.

हिंगोली शहरातील महावीर भवन येथे खासदार हेमंत पाटील यांच्या वतीने शिवसेना, भाजपा महायुतीचे कार्यकर्ते, सर्व क्षेत्रातील नागरिक, प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी कृतज्ञता सोहळा व रसाळी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव माने हे होते. तर शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, लोकसभा सहसंपर्वâप्रमुख डॉ. रमेश शिंदे, जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, माजी सभापती रामेश्वर शिंदे, जिल्हा संघटक उध्दवराव गायकवाड, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, शहरप्रमुख अशोक नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार हेमंत पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, 5 लाख 86 हजार 312 मते देऊन प्रचंड मताधिक्याने मला विजयी करण्याचे खरे शिल्पकार शिवसैनिक, महायुतीचे कार्यकर्ते व जनता असून यासाठीच तुमच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. लोकशाहीत मतदार हेच राजे आहेत. ज्या मतदारांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसण्याची संधी दिली. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव उपलब्ध राहणार आहे. जनतेची सेवा करा, हिच शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असून त्यांच्या संस्काराची शिदोरी आमच्या पाठीशी आहे. मतदारसंघात 2300 गावे, वाडी-तांडे असुन दररोज दिड हजार फोन येतात. त्यामुळे कधी संपर्क झाला नाही तर नाराज होऊ नका आणि विनाकारण सहज फोन करु नका ही हक्काची मागणी असल्याचेही खासदार पाटील म्हणाले. मात्र, 7038300001 हा व्हॉट्सअप क्रमांक राहणार असून त्यावर वैयक्तीक व सार्वजनिक तक्रारी आल्यास प्रशासनासोबत पत्र व्यवहार करुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या