समृद्धी महामार्ग थांबवणार!: उद्धव ठाकरे

सामना प्रतिनिधी । जालना

शेतकऱ्यांचे समाधान झाल्याशिवाय राज्यात होणारा समृध्दी महामार्ग होऊ देणार नसल्याचा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते जालना जिल्ह्यातील रामनगर येथे बोलते. यावेळी शेतक-यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

shivsena_uddhav-thackeray

राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी मिळवून दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जिल्ह्यातील शेतक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मण वडले,सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, डॉ. हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे.बोराडे आदी होते.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले की, समृध्दी महामार्गात जाणा-या बागायती जमिनी दोन वर्षांपासून जिरायती दाखवण्यात येत आहे. हा महामार्ग फळ बागांच्या उरावरुन जात आहे. शेतक-यांचे समाधान झाल्याशिवाय समृध्दी महामार्ग होणार नाही, असा इशारा देतानाच ते म्हणाले की, या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना जमिनी पाहण्यासाठी पाठवणार आहे. शेतक-यांचे समाधान होईल तेंव्हाच समृध्दी महामार्ग होईल. पुढे बोलतांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर खुर्ची मिळाली की तुम्ही कोण आणि आम्ही कोण या जात कुळीतली शिवसेना नसून त्यामुळेच शिवसेना सातत्याने शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

मराठवाडा दुष्काळात होरपळ होता तेंव्हाही शिवसेना खंबीरपणे पाठीशी होती. शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रश्नांवर बोलतांना राज्यात आपली अर्धी सत्ता असल्याचा उल्लेख करुन महाराष्ट्राचा येणारा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असल्याचे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तसेच राज्यातील सत्तांतरानंतर जेंव्हा शिवसेनेने अधिकृतरित्या विरोधी पक्षाची भुमिका घेतली होती. त्यावेळीही आपण दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यात आला होता. शेतकरी कर्जमुक्तीची शिवसेनेची भूमिका आजची नाही, कर्जमाफी आंदोलनात शिवसेना शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली नसती तर शेतक-यांचा आक्रोश वाया गेला असता. ज्यांना आपण सत्तेवर बसवले त्यांनीच नोटाबंदीचा धोंडा सर्वसामान्यांच्या पदरात टाकला. त्यांच्याच आवाहनावरुन शेतक-यांनी उत्पादन वाढविले तरीही त्यांच्या पदरात धोंडेच पडले. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत भाजपाने कर्जमुक्तीचा नारा दिला होता. तेंव्हाच आम्ही सांगितले की,सत्ता असूनही राज्यात कर्जमुक्ती का करीत नाहीत, तसेच पुणतांब्याच्या शेतक-यांनी आम्ही संप करणार म्हणून सांगितले. तेंव्हा मी म्हणालो तुम्ही बेधडक पुढे व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे, असेही खंबीरपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी प्रास्ताविकात राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, सत्तेत राहून कर्जमाफीचा एैतिहासिक लढा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उभा केला. राज्यातील शेतकरी आपला आभारी आहे, असे सांगत खोतकर पुढे म्हणाले की, देशातल्या विविध राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सरकारने चिरडले मात्र महाराष्ट्रात शिवसेना शेतक-यांच्या पाठीशी उभी असल्याने राज्यात कर्जमुक्ती झाली. कर्जमुक्तीत सरकारची भुमिका वेगळी होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारची कोंडी केली. ठाकरे परिवाराचे उपकार फेडू शकत नसल्याचेही खोतकरांनी सांगितले.

एक प्रतिक्रिया