उद्धव ठाकरे दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर, शिर्डी विमानतळावर शिवसैनिकांनी केलं स्वागत

पावसाने ओढ दिल्याने राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. उभी पिकं करपून गेल्याने संकटात सापडलेल्या बळीराजाच्या व्यथा जाणून घेण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. बळीराजाला धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट शेतकऱ्याच्या भेटीला पोहोचले असून शुक्रवारी सकाळी त्यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. यावेळी विमानतळावर मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.

नगर जिल्ह्यात उद्धव ठाकरे एकदिवसीय शेतकरी संवाद दौरा आहे. नगरमधील राहाता तालुक्यातील राऊत वस्ती, कोलवड गाव येथे ते दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहेत. कोपरगावातील कातरी गावात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर संगमनेर आणि पुणतांबा येथेही ते भेट देणार आहेत.

उद्धव ठाकरे यांचे सकाळी 11.45 वाजता शिर्डी विमानतळावर आगमन झाले. शिवसैनिकांनी त्यांचे मोठ्या दणक्यात स्वागत केले. यावेळी ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘आवाज कुणाचा – शिवसेनेचा’, अशा घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून गेला होता.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिर्डी लोकसभा संपर्क नेते बबनराव घोलप, आमदार शंकरराव गडाख, आमदार सुनील शिंदे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उपनेते साजन सातपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, सहसंपर्क रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहर प्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख मुजीब शेख, माजी जिल्हा प्रमुख माजी महापौर भगवान फुलसौंदर, राजेंद्र झावरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य, उपजिल्हाप्रमुख संदेश कारले, राजेंद्र पठारे, माजी विश्वस्त सचिन कोते, नाना बावके, राजेंद्र झावरे, भागवत लांडगे, सागर लोटे, मुकुंद सिंनगर, कलविंदर सिंग दडियल, भरत मोरे, किरण खर्डे आदी उपस्थित होते.