उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा !

सामना प्रतिनिधी । जळगाव

भाजपा मध्ये आता राम उरला नसून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांनी प्रभु श्रीरामचंद्राच्या मंदिर निर्माणसाठी चलो अयोध्याचा नारा दिल्यावर डिसेंबर मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील अयोध्येत जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. पंतप्रधानांना हलविण्याची ताकद असलेल्या उध्दवसाहेब ठाकरे यांना पाठबळ देऊन हिंदू अस्मितेची ताकद दाखविण्यासाठी जिल्हाभरात गावोगावी 24 नोव्हेंबरला महाआरतीचे आयोजन करा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या 24 व 25 नोव्हेंबर रोजीच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदार संघाची शिवसेनेची बैठक आज पद्मालय शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीला सहसंपर्क प्रमुख तथा माजी आमदार आर.ओ. पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने बाबरीचा कलंक उध्वस्त करण्याचे काम झाले असून आता त्यांचे सुपूत्र उध्दव साहेब ठाकरे हे राममंदिर निर्माणासाठी अयोध्येत जात आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात चलो अयोध्या ही घोषणा उध्दव साहेब यांनी केल्यावर देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे.

अयोध्या येथे जळगाव जिल्ह्यातुन 200 पदाधिकारी व शिवसैनिक जाणार आहेत. जिल्ह्यात राहणाऱ्या या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रत्येक शहर व गावामध्ये 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी महाआरतीचे आयोजन करावे. यासाठी हिंदुत्ववादी संघटना, धार्मिक संघटना, वारकरी संप्रदाय, संत निरंकारी मंडळ, स्वामी समर्थ मंडळ अशा सर्वांचा सहभाग नोंदवावा. तसेच महाआरतीचे योग्य नियोजन करण्यात यावे. महिला व तरूणांचा सहभाग देखील वाढविण्यावर भर द्यावा. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मागे ताकद उभी करण्यासाठी प्रत्येकाने आळस झटकून कामाला लागावे.

दरम्यान, शिवसेनेचे उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी अयोध्याला जाणार आहेत. या बैठकीला जि.प. सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, पवन सोनवणे, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक गणेश सोनवणे, उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख गजानन पाटील, विजय पाटील, आर.व्ही. पाटील, वासुदेव पाटील, यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीनंतर जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व सहसंपर्क प्रमुख आर.ओ. पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीची माहिती दिली.