शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत शिवसेनेचे आंदोलन चालूच राहणार!

3

सामना प्रतिनिधी । बीड

पुणे येथील साखर संकुलासमोर बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांच्या विरोधात गाळप झालेल्या ऊसाची बीले शेतकऱ्यांना न मिळाल्याने शिवसेनेच्या वतीने मंगळवार पासून सुरु असलेले रसवंती आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत शिवसेनेचे आंदोलन चालूच राहणार असे वक्तव्य शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले. या आंदोलनाला शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी भेट देवून पुणे जिल्हा शिवसेना आंदोलनकर्त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी पाठीशी असल्याचे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले आहे.

बीड जिल्ह्यातील एन.एस.एल.प्रा.लि.युनिट 3 जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या तिन्ही कारखान्यांनी गाळप झालेल्या ऊसाची बीले अदा न केल्यामुळे पुणे येथील साखर संकुल, साखर आयुक्त कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून शिवसेनेचे मराठवाडा संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी व शिवसैनिकांनी ‘रसवंती आंदोलन’ सुरु केलेले असून आज दिनांक 17 जानेवारी गुरुवार तिसऱ्या दिवशी देखील सुरु आहे. साखर आयुक्त कार्यालयात दोन कारखान्याचे शिष्टमंडळ आणि आंदोलनकर्ते यांच्यात साखर संचालक ज्ञानदेव मुकणे यांनी बैठक घेतली या बैठकीत तीन कारखान्यांपैकी छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या दोन कारखाना प्रशासनाने डिसेंबर अखेरपर्यंतच्या गाळप झालेल्या ऊस बीलाची रक्कम येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल असे कळविल्यामुळे रसवंती आंदोलनाला यश आले आहे. मात्र जय महेश साखर कारखाना प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांना काहीही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे आंदोलक व शेतकरी आंदोलनाची तिव्रता अधिक वाढविणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. हा कारखाना मात्र शेतकऱ्यांची बीले देण्यास मागील वर्षांपासून सतत टाळाटाळ दिरंगाई करत आहे व सर्व नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बीले देण्या संदर्भात जय महेश साखर कारखान्याचे प्रशासन ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत हे रसवंती आंदोलन सुरु राहील असे शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले आहे. यावरुन जय महेश साखर कारखान्याची अडेलतट्टूपणाच्या भूमिकेचे सर्व जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. उद्या दिनांक 18 जानेवारी पासून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येईल असे निवेदनाद्वारे आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले आहे.