भाजप सरकारचा जनाजा काढून शिवसेनेचा समांतर रस्ते आंदोलनाला पाठिंबा

सामना प्रतिनिधी । जळगाव

शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे समांतर रस्ते करण्यात याव्यात या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा देवुन भाजपा सरकारचा जनाजा काढला. राष्ट्रीय महामार्गावर हिंदू असो की मुस्लीम सर्व धर्मीयांचा जीव जात असल्याने हे आंदोलन केल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जळगाव शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 अर्थात एशियन हायवे क्र. 46 च्या लगतच्या समांतर रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असुन जळगाव समांतर रस्ते कृती समितीच्या वतीने सहा दिवसापासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला विविध राजकीय पक्ष, सामाजीक संघटना, नागरिक पाठिंबा देत आहेत. शिवसेनेच्या वतीने अनोखे आंदोलन छेडत मंगळवारी या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातुन जनाजा काढुन शिवसैनिक व नागरिक साखळी उपोषणाच्या ठिकाणी पोहचले. महानगरप्रमुख शरद तायडे यांनी हातात मडके घेऊन सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकसभा क्षेत्र सहसंपर्कप्रमुख तथा माजी आमदार आर.ओ. पाटील, शिवसेनेचे गटनेते डॉ. सुनिल महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णु भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, प्रशांत नाईक, प्रकाश वेदमुथा, शोभा चौधरी, मनिषा पाटील, माजी महानरप्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातुनच उपोषणस्थळापर्यंत हा जनाजा शिवसैनिकांनी नेला.