शिवसेनेच्या दणक्याने भाजप बॅकफूटवर

सामना प्रतिनिधी । भार्इंदर

मीरा-भार्इंदरकरांवर लादण्यात येणारा जिझिया कर रद्द करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने देताच भाजप बॅकफूटवर गेले आहे. नवीन चार करांपैकी मलनिस्सारण, रस्ते आणि पाणीपुरवठा लाभ कर रद्द करत मालमत्ता आणि पाणीपट्टीत मीरा-भार्इंदर पालिकेने कपात केली आहे. त्यामुळे करदात्या शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मीरा-भार्इंदर महानगरपालिकेत बहुमताने सत्तेत आल्यापासून भाजपने शहराच्या विकासाकडे चक्क दुर्लक्ष करत मीरा-भार्इंदरकरांवर वेगवेगळे कर लादण्याचा प्रयत्न केला. भाजपने प्रथम मालमत्ता आणि पाणीपट्टी करात भरमसाठ वाढ केली. यानंतर नव्याने मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणीपुरवठा लाभ कर, रस्ते कर आणि घनकचरा शुल्क कर असे चार नवे कर लादले. या करांना आणि करवाढीला बहुमताच्या जोरावर स्थायी समितीत मंजुरीसुद्धा दिली आणि आज होणाऱ्या महासभेत बहुमताच्या जोरावर त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णयसुद्धा भाजपने घेतला होता.

भाजपचे गिरा तो भी टांग उपर
शिवसेना आणि काँग्रेसच्या दणक्याने बॅकफूटवर जावे लागले असले तरी ही करवाढ नागरिकांचे हित बघून आम्ही मागे घेत आहोत, असे आज महापौर डिंपल कपाडिया, उपमहापौर चंद्रकांत वैती आणि स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.