कुणाशीही युती नाही! – उद्धव ठाकरे

मुंबई -कुणाशीही युती नाही. माझ्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्टपणे सांगितले. ते ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

‘मनसे’ने शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. तशा बातम्याही प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. आज पत्रकारांनी त्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला आणि कुणाशीही युती नाही. माझ्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही असे सांगितले.

कुणाला फ्रेंडली मॅच खेळायचीय हे ठाऊक नाही!

”कुणाला आमच्याशी फ्रेंडली मॅच खेळायची आहे हे ठाऊक नाही. आम्ही मात्र पूर्ण ताकदीनिशी आता मैदानात उतरलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र ‘भगवा’मय केल्याशिवाय राहणार नाही” असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

महाराष्ट्रात आमची ‘फ्रेंडली मॅच’ असेल आणि याचा परिणाम केंद्र व राज्यातील सत्तेवर होणार नाही असे वक्तव्य भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. विधानसभेतसुद्धा ते लढले होते तेव्हा हा शब्द त्यांनी वापरला नव्हता. मग आताच हा शब्द वापरण्याची गरज का निर्माण झाली? ज्या पद्धतीने त्यांचे आमच्याशी वर्तन सुरू होते ते पाहून मुंबई आणि महाराष्ट्रातील सामान्य नागरिक हा संतापाने पेटून उठलेला आहे. त्यांना कुणालाही हा बेगुमानपणा मान्य नाही. शिवसेनेसोबत त्यांची जी वागणूक आहे ती महाराष्ट्रातील कुणालाही आवडलेली नाही.