नंदुरबार नगरपालिकेवर काँग्रेस, शिवसेना युतीची सत्ता

सामना प्रतिनिधी । नाशिक

नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना युतीने एकहाती सत्ता घेतली. ३९ पैकी काँग्रेसला २४, तर शिवसेनेला चार जागा मिळाल्या. शिवसेनेने पाच जागा लढविल्या होत्या, एका उमेदवाराचा पराभव झाला. सर्वच्या सर्व ३९ जागा लढविणाऱया भाजपाला अवघ्या ११ जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी या विराजमान झाल्या.

नंदुरबार निवडणुकीचा निकाल जाहीर होताच काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नगरसेवकपदाच्या एकूण ३९ जागांसाठी येथे निवडणूक झाली. काँग्रेसने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली ३४ जागा लढविल्या, त्यात २४ जागांवर त्यांनी विजय संपादन केला.

नगराध्यक्षपदी रत्ना रघुवंशी

काँग्रेस आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी आणि भाजपाचे अंमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी यांच्यात नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली.

रत्ना रघुवंशी यांना ३६ हजार ६६१ मते मिळाली, तर चौधरी यांना ३१ हजार ३८० मते मिळाल्याने त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला.

शिवसेना, काँग्रेसच्या विजयी शिलेदारांचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, सहसंपर्कप्रमुख संजय उकिर्डे, राजधर माळी, रमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

शिवसेनेने केला भाजपाचा पराभव

शिवसेनेने काँग्रेसशी युती करून पाच जागा लढविल्या होत्या, त्यात चार जागांवर विजय मिळाला. शिवसेनेच्या शोभाताई दिलीपराव मोरे यांनी भाजपाचे शीतल ऊर्फ मुन्ना पटेल यांचा एक हजार मतांनी पराभव केला. भावना गुरव यांनी गायत्री पाटील यांचा, तर कल्याणी मराठे यांनी पुष्पा चौधरी यांचा आणि हर्षा बाफना यांनी पुष्पा पाटील यांचा पराभव केला. या चार उमेदवारांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. भाजपाने सर्वच्या सर्व ३९ जागा लढविल्या. मात्र, अवघ्या अकरा जागांवर त्यांना समाधान मानावे लागले.