कर्जमाफीवर शिवसेनेची भूमिका प्रामाणिक; विरोधकांचे केवळ राजकारण

सामना ऑनलाईन, मुंबई

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मित्रपक्ष शिवसेनेची भूमिका प्रामाणिक आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विरोधकांनी मात्र शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती चालविण्याचा प्रयत्न केला. विरोधकांची भूमिका बेगडी असून त्यांना या मुद्द्यावर केवळ राजकारणच करायचे असल्याने ते उघडे पडले असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. शेतकऱ्याची आजची अवस्था ही विरोधकांच्याच १५ वर्षांतल्या पापाचे फळ असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्धच आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन केले त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी ही सर्वच पक्षांची इच्छा आहे, मात्र हा निर्णय एका दिवसात घेणे शक्य नाही. आपण स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. राज्य सरकारचे कमिटमेंट असल्याचेही सांगितले तेव्हा शिवसेनेने अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला. मात्र विरोधकांना या मुद्द्याचे केवळ राजकारण करायचे होते. यांच्या मनात शेतकऱ्याबद्दल श्रद्धा असत्या तर यांनी बजेट ऐकून घेतले असते, असेही ते यावेळी म्हणाले.

राज्यातील ३१ लाख कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० हजार ५०० कोटींचा निधी लागेल. तसे करायचे झाल्यास अन्य कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी वर्षभरासाठी निधीच उपलब्ध होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्धच आहे. त्यासाठी केंद्राची मदत घेणार असून केंद्र सरकार संपूर्ण देशासाठीच योजना तयार करणार आहे. राज्य सरकारदेखील आपला वाटा उचलण्यास तयार आहे. केंद्र सरकार आपल्या पाठीशी उभे राहील असा ठाम विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यालाही लाभ मिळणार
आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफी झाली त्यात भ्रष्टाचाराने अडचणीत आलेल्या बँकांचे चांगभले झाले. शेतकऱ्यांची बंद पडलेली खाती पुन्हा जीवित करून त्यावर कर्जे राइट ऑफ करण्यात आली. आता मात्र तसे होणार नसून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल असाच निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकूण १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी ३१ लाख शेतकरी कर्जबाजारी आहेत तर १ कोटी शेतकरी हे नियमित कर्ज भरतात. या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यालाही लाभ होईल असाच निर्णय घेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भूखंड घेतले, पण उद्योग उभारलेच नाहीत