शिववाहतूक सेनेचे ‘चावी जमा’ आंदोलन

सामना प्रतिनिधी । मुंबई 

पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भाईंदरमध्ये बेकायदा वाहतूक करणाऱ्या चालकांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. याविरोधात टॅक्सीचालकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत होते. याचा जाब विचारण्यासाठी शिववाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली अधिपृत वाहतूकधारकांनी ठाणे येथील आरटीओ कार्यालयावर धडक देत जाब विचारला. या दणक्याने खडबडून जाग आलेल्या अधिकाऱ्यांनी लागलीच भाईंदरमध्ये कारवाईचा बडगा उगारत मोहीम सुरू केली.

प्रवाशांच्या सोयीसाठी मीरा-भाईंदर शहरात शिववाहतूक सेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी टॅक्सी थांबे उभारण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात अनेक खासगी अथवा कंपन्यांचे वाहनचालक आपली वाहने येथे उभी करून टॅक्सीचालकांचे प्रवासी पळवत आहेत. यासंदर्भात संबंधित टॅक्सीचालकांनी अनेक वेळा ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि स्थानिक पोलिसांकडे तक्रारीसुद्धा केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.

त्यामुळे टॅक्सीचालकांनी वाहतूक सेनेच्या माध्यमातून एक अनोखे आंदोलन छेडत प्रादेशिक परिवहन विभागाच्या ठाणे येथील कार्यालयावर धडक देत ‘चावी जमा’ आंदोलन केले. यावेळी मीरा-भाईंदर शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष श्याम म्हाप्रळकर, चंद्रकांत लोहार, भावेश ठोंबरे, संजय कांबळे, सागर मालगुणकर, तात्याबा कदम, मिलिंद खरे, विजय कदम, चिराग दावडा आदी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या पुढ्यात चाव्यांचा खच
शिववाहतूक सेनेच्या या आंदोलनात शेकडो टॅक्सीचालकांनी सहभाग घेत आपल्या गाड्यांच्या चाव्या आरटीओ कार्यालयात जमा केल्या. त्यामुळे चाव्यांचा खचच कार्यालयातील टेबलावर दिसत होता. बेकायदा वाहनांवर कारवाई करा, अन्यथा आम्ही वाहनांसाठी घेतलेले कर्ज तुम्ही फेडा, अशा जोरदार घोषणाही याप्रसंगी देण्यात आल्या.