
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडचा विरोधाला न जुमानता जेएनपीटीच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच दास्तान फाटा येथे उभारण्यात येत असलेल्या शिव-समर्थ स्मारकाचे उदघाटन येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा जेएनपीटीचा प्रयत्न असून छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे पुतळे या स्मारकावर नुकतेच चढविण्यात आले आहेत.
जेएनपीटीच्या मालकीच्या दास्तानफाटा-जासई दरम्यान दोन एकर क्षेत्रात 32 कोटी रूपये खर्च करून शिवस्मारक उभारण्यात येत आहे. जेएनपीटीच्या मालकीच्या दोन एकर जागेत हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या शिवस्मारक क्षेत्रात आर्ट गॅलरी बनविण्यात येणार आहे. या आर्ट गॅलरीमध्ये शिवरायांच्या जीवनावरील विविध प्रसंगांची, धातूची शिल्पे उभारण्यात येणार असून रायगडमधील थोर व्यक्तीची प्रासंगिक चित्रं आर्ट गॅलरीत लावली जाणार आहेत. या आर्ट गॅलरीमध्ये शिवकालीन वस्तूंचे म्युझियमही साकारले जाणार आहे. तसेच सांस्कृतिक आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यासाठी मिनी एमपी थिएटरही उभारण्यात येणार आहे. क्षुधा शांत करण्यासाठी अद्यावत कॅफेटेरियाबरोबरच दीड एकर क्षेत्रात फाऊंटन आणि उद्यानाचीही निर्मिती करण्यात येणार आहे. स्मारक उभारण्यासाठी २२ मीटर उंचीचे बिल्डिंग स्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे. १६०० स्क्वेअर मीटर क्षेत्रात हे बिल्डिंग स्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. म्हणजे स्ट्रक्चरसह साधारणता ९२.५ फूट उंचीवर शिव समर्थ स्मारक बसविण्यात येणार आहे.
सुरूवातीला 3 फेब्रुवारी ला या स्मारकाचे उद्घाटन होणार होते. मात्र उदघाटनाला होणारा विरोध पहाता हा उदघाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला. मात्र अद्यापही या स्मारकाचे काम अपुर्ण असून देखिल अखेर 17 फेब्रुवारीला या स्मारकाचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नौकानयन मंत्री नितिन गडकरी, शिवरायांचे 13वे वंशज संभाजीराजे भोसले, जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला अंदाजे 3 ते 4 लाख नाना धर्माधिकारी संप्रदायाचे लोक उपस्थित राहणार असल्याने त्या पद्धतीने तयारी सुरू आहे.