#BiggBossMarathi- दिव्यांगांनी डिझाईन केलेले शूज घालतेय ही अभिनेत्री

318

सामना ऑनलाईन । मुंबई

‘बिग बॉस मराठी सिझन 2’ चे बिगुल 26 मे रोजी वाजलं. मराठीतले अनेक चेहरे बिग बॉसच्या घरात आता धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. पण यात एक अशीही अभिनेत्री आहे, जिने दिव्यांगांनी डिझाईन केलेले शूज घालून त्यांना एक प्रकारे मदतच करत आहे.

ही अभिनेत्री आहे देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे. शिवानीच्या स्टाइलिश आउटफिट, एक्सेसरीज आणि शूजची क्रेझ तिच्या फॅन्समध्ये आहे. आता अभिनेत्री आहे, म्हटल्यावर कोणत्यातरी महागड्या डिझायनरकडूनच तिने हे सर्व डिझाइन केलेले असणार, असं अनेकांना वाटतंय. शिवानीचे शूज डिझाइनर जरूर आहेत. पण कोणत्याही महागड्या डिझायनरने ते डिझाइन केलेले नसून, ते दिव्यांग मुलांनी डिझाइन केलेले आहेत. फिट मी अप एनजीओच्या मुलांनी डिझाइन केलेले हे शूज शिवानी सध्या घालत आहे. दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ काम करते. ह्या संस्थेचा ‘फिट मी अप’ हा दिव्यांग मुलांना रोजगार मिळवण्यासाठी सुरू झालेला प्रकल्प आहे.

shivani-surve-shose

फिट मी अपची संचालक, प्रसन्नती अरोरा सांगते, “मी आणि माझी मैत्रिण दिपशिखाने 2011मध्ये दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ची सुरूवात केली. त्यांना सज्ञान झाल्यावर रोजगार मिळावा हा या मागचा उद्देश आहे. आणि आम्हांला आनंद आहे,की, शिवानी सुर्वेसारखे सेलिब्रिटीज आमच्या प्रकल्पाला अशा पद्धतीने पाठिंबा देत आहेत.”

बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर शिवानी सुर्वे या संदर्भात म्हणाली की, “जरी ही मुलं दिव्यांग असली तरीही कोणत्याही पारंगत डिझायनरप्रमाणे त्यांनी शूज डिझाइन केले आहेत. त्यामुळे मी त्यांनी डिझाइन केलेले तीन-चार शूज घेऊन बिगबॉसमध्ये चालले आहे. त्यांच्यासाठी माझ्या परीने उचललेला हा खारीचाच वाटा आहे, असं मनोगत शिवानी हिने व्यक्त केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या