मुलायम आणि शिवपाल यांची पक्षातच कोंडी

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा सुरू आहे ती फक्त समाजवादी पक्षातील अंतर्गत राजकारणाची. ‘सप’मध्ये अखिलेश यादव वडिलांपेक्षा शक्तीशाली ठरले असून पक्षात प्रत्येक निर्णयात आता फक्त त्यांच्या गटाचेच वर्चस्व दिसून येत आहे. आधी पक्षाचे चिन्ह, मग पक्षाचे निवडणुकीसाठीचे उमेदवार आणि आता स्टार प्रचारक सगळ्यामध्ये अखिलेश यांच्या गटाचा प्रभाव दिसत असून अनेक काळ पक्षाचे स्टार प्रचारक राहिलेले शिवपाल यादव यांचे नाव त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता पक्षातूनच मुलायम सिंह आणि त्यांचे बंधू शिवपाल यांची कोंडी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला मोठं सख्याबळ मिळवून देण्यात शिवपाल यादव यांचा मोठा हात होता. मात्र अखिलेश यादव मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी पक्षावर पकड इतकी मजबूत केली की स्वत: मुलायम सिंह देखील हतबल ठरले. अखिलेश यांच्या गटाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवपाल यादव यांच स्थान कमी करण्याचा प्रयत्न बऱ्याच दिवसांपासून चालवला आणि त्यात त्यांना हवे तसे यश मिळत गेले. त्यामुळे पक्षाला मोठं करण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या शिवपाल यादव यांना उमेदवारी दिली असली तरी त्याचं महत्वच कमी करून टाकण्यात आलं आहे. ते बराच काळ पक्षाचे स्टार प्रचारक मानले जात होते. मात्र यंदा जाहीर झालेल्या स्टार प्रचारकांमध्ये त्यांचे नाव वगळण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या गटाकडे दिलेले पक्षाचे चिन्ह, त्यांच्याच गटातील नेत्यांना मिळालेली उमेदवारी आणि आता स्टार प्रचारकांची यादी असा अखिलेश यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढलेला दिसत असला तरी उत्तर प्रदेशातील जनता अखिलेश यांच्या प्रभावाखाली आहे का असा सवाल राजकीय वर्तुळात केला जात आहे.