विहिरीत पडलेल्या तरुणाचे प्राण शिवसैनिकांनी वाचवले

सामना प्रतिनिधी । पिशोर

सोमवारी रात्री रस्ता न दिसल्यामुळे खडकी येथील शिवारातील विहिरीत एक तरुण पडला. रात्रभर विहिरीत पडलेल्या तरुणास मंगळवारी सकाळी शिवसैनिकांनी सुखरूप विहिरीबाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.

खडकी शिवारातील गट क्रमांक ७० मध्ये रावसाहेब रामराव जाधव यांची विहीर आहे. जवखेड येथील कृष्णा लक्ष्मण सपकाळ हा तरुण सोमवारी रात्री पिशोर येथून घरी जाण्यास निघाला. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्ता कळाला नाही व तो विहिरीत पडला. रात्रभर विद्युत पंपाच्या पाईपला पकडून बसला. मंगळवारी सकाळी विहिरीच्या बाजूला असलेल्या शेतात शेतकरी जनावरांना चरवण्यासाठी गेला असता त्याच्या दुचाकीचा आवाज कृष्णा सपकाळला आला. विहिरीतूनच त्याने आरडाओरडा केला. आवाज ऐकून शेतकरी विहिरीजवळ आला, तर त्याला विहिरीत तरुण पडलेला दिसला. त्याने लगेच शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गंपू जाधव यांना या घटनेची माहिती दिली. गंपू जाधव यांनी शिवसैनिकांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. रात्रभर विहिरीत राहिलेल्या तरुणास सुखरूप बाहेर काढले. उपचारासाठी बीट जमादार संजय देवरे यांनी पिशोरच्या ग्रामीण रुग्णालयात तरुणाला दाखल केले. या घटनेची पिशोर पोलीस ठाण्यात नोंद केली. विहिरीत पडलेल्या तरुणास बाहेर काढण्यासाठी बापू वाघ, अमोल जाधव, अनिल जाधव, राजेंद्र जाधव, दिनेश जाधव, वैभव जाधव, शेवंता वाघ, महादू वाघ, कृष्णा वाघ, सुनील आहेर, काकाराव वाघ, गोपीनाथ वाघ, धोंडू मोकासे, दीपक चव्हाण, कपिल शेजवळ यांनी मदत केली.