मेटेंच्या पक्षात ‘संग्राम’, राजेंद्र म्हस्केंना पदावरून काढले

सामना ऑनलाईन, बीड

गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या जवळ गेलेले शिवसंग्रामचे नेते राजेंद्र मस्के यांना शिवसंग्राम च्या युवाप्रदेशाध्यक्ष या पदावरून काढण्यात आले. काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार विनायक मेटे हे उपस्थित होते. यावेळी मेटे यांच्यासमोरच काही कार्यकर्त्यांनी ‘बीडचा आमदार कसा असावा , राजेंद्र मस्के सारखा असावा’ अशा घोषणा दिल्या होत्या. यामुळे मेटे जाम भडकले होते.

राजेंद्र मस्के गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सध्या पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचं फारसं जमत नाही. त्यातच म्हस्केंची भाजपशी सलगी वाढली होती. यामुळे मेटे आधीच अस्वस्थ होते.त्यांची अस्वस्थता म्हस्केंच्या नावाने घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना गद्दार म्हटल्यानंतर सगळ्या बीडवासीयांना कळाली होती. मंगळवारी पुण्यात शिवसंग्रामचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात अखेर मेटेंनी म्हस्केंना युवा प्रदेशाध्यक्ष या पदावरून काढून टाकले. या घडामोडींनंतर राजेंद्र मस्के यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्याला पदावरून काढले असले तरी आपण कार्यकर्ते म्हणून शिवसंग्रामचे काम चालूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.