शिवसेनेची विरोधकांना धोबीपछाड, 18 शिलेदारांचा दणदणीत विजय

67
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना-भाजप महायुतीचेच महाराष्ट्रात वर्चस्व राहणार हे निश्चित मानले जात होते. एक्झिट पोलचेही आकडे कमी पडतील या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाकिताला तंतोतंत खरे ठरवत शिवसेनेच्या उमेदवारांनी विरोधकांना धोबीपछाड दिला. प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत शिवसेनेचे 18 शिलेदार प्रचंड बहुमताने विजयी झाले.

महाराष्ट्रभरात महायुतीलाच सर्वाधिक जागा मिळणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता. महायुतीला 32-36 जागा आणि शिवसेनेला 10 ते 13 जागा मिळतील असे आडाखे मांडले जात होते. मात्र प्रत्यक्षात हे सर्व आडाखे मागे टाकत शिवसेनेने 18 जागांवर खणखणीत विजय मिळवला. बुलढाण्यात प्रतापराव जाधव हे राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना धूळ चारत 1 लाख 33 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. रामटेकमधून अपेक्षेप्रमाणेच कृपाल तुमाणे यांनी काँग्रेसच्या किशोर गजभिये यांचा तब्बल 1 लाख 15 हजार मतांनी पराभव केला. यवतमाळ-वाशिमच्या निकालाविषयीचे अंदाज फोल ठरवत खासदार भावना गवळी यांनी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना 1 लाख 14 हजारांच्या मताधिक्याने पराभूत केले. परभणीतून संजय जाधव यांनी अटीतटीच्या लढतीत 42 हजार 199 इतक्या मताधिक्याने राजेश विटेकर यांचा पराभव केला. हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांचा 2 लाख 91 हजार मतांनी दणदणीत पराभव केला. तर पालघरमध्ये राजेंद्र गावीत यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा 88 हजार मतांनी पराभव केला. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांचा 3 लाख 46 हजार मतांनी पराभव केला. तर ठाण्यात राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा चार लाख 9 हजार मतांनी पराभव केला. मुंबईत खासदार गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, अरविंद सावंत यांनी लाखालाखाच्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनी शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांना तब्बल 2 लाख 15 हजारांच्या मताधिक्याने धोबीपछाड दिली. शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे यांनी जोरदार मुसंडी मारत भाऊसाहेब कांबळे यांचा 1 लाख 20 हजार मतांनी विजय झाला.

शिवसेनेचे जायंट किलर
हातकणंगलेचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना जोर का झटका देत शिवसेनेचे धैर्यशिल माने 96 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. तर कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा 2 लाख 70 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. खासदारकीची पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱया ओमराजे निंबाळकर यांनी धाराशीवमध्ये काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना 1 लाख 27 हजार इतक्या मताधिक्याने धूळ चारली. हिंगोलीत हेमंत पाटील यांनी सुभाष वानखेडे यांना धोबीपछाड देत तब्बल 2 लाख 70 हजारांची आघाडी मिळविली.

आपली प्रतिक्रिया द्या