Lok Sabha 2019 शिवसेना-भाजप युती कोल्हापुरातून फुंकणार प्रचाराचे रणशिंग

सामना ऑनलाईन, मुंबई

काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोडे जागावाटपावर अडले असतानाच शिवसेना-भाजप युतीने आघाडी घेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कार्यक्रम आज जाहीर केला. दिल्लीच्या तख्तावर भगवे तोरण बांधण्यासाठी शिवसेना-भाजप युती कोल्हापुरातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. रविवारी 24 मार्च रोजी करवीरनिवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ वाढवण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या युतीच्या विराट सभेतून विजयाचा वज्रनिर्धार केला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल रविवारी 10 मार्चला वाजले. त्यानंतर सर्वच पक्षांच्या बैठकांना जोर आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडीची घोषणा केली असली तरी जागावाटपावरून आघाडीच्या गोटात बिघाडी झाली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीनेही  काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. एकीकडे आघाडीचा तंबू डगमगू लागला असतानाच दुसरीकडे शिवसेना-भाजपने युती भक्कम असल्याचे जाहीर केलेच पण त्याचबरोबर लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला.

मातोश्री निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ बैठक झाली.  शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत सर्व 48 मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. युतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणारी विराट सभा कोल्हापुरात घेण्यावर यावेळी शिक्कामोर्तब झाले.

युतीच्या पदाधिकाऱ्यांचे संयुक्त मेळावे

कोल्हापुरातील सभेआधी युतीच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे संयुक्त मेळावे घेण्यात येणार आहेत. या सर्व मेळाव्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

15 मार्च

  • सकाळी – अमरावती (प. विदर्भ)
  • सायंकाळी – नागपूर (पूर्व विदर्भ)

17 मार्च

  • सकाळी – संभाजीनगर (मराठवाडा)
  • सायंकाळी – नाशिक (उत्तर महाराष्ट्र)

18 मार्च

  • सकाळी – पुणे (प. महाराष्ट्र)
  • सायंकाळी – नवी मुंबई (कोकण)

संयुक्त वचननामा लवकरच

मुंबईतील युतीच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्याच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येतील. राज्याच्या जिव्हाळ्याचे विषय आणि  विकासाचा युतीचा संयुक्त वचननामाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असा निर्णयही या बैठकीत करण्यात आला.