शिवसेना -भाजप युतीचा सोमवारी पुण्यात मेळावा

सामना प्रतिनिधी । पुणे

शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या सोमवारी (दि. १८) पश्चिम महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांतील दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे.

पुणे, सोलापूर, बारामती, माढा, शिरूर, मावळ, कोल्हापूर, सातारा, सांगली, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांतील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन होणार आहे. मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील युतीचे सर्व मंत्री, लोकसभा व राज्यसभा सदस्य, विधानसभा व विधान परिषद सदस्य हे विशेष निमंत्रित आहेत.

संपर्कप्रमुख व सहसंपर्कप्रमुख यांच्यासह ठराविक पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले असल्याने पासची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी पाससंदर्भात संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र युतीचे समन्वयक गिरीश बापट आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.