नव्या वर्षात शिवसेनेची वचनपूर्ती, पालिकेच्या कामांचा सपाटा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेने नवनव्या प्रकल्पांचा सपाटा सुरू केला आहे. निवडणुकीच्यावेळी वचननाम्यात दिलेल्या वचनांची या नवीन वर्षात पूर्तता करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. नियमित विकासकामांबरोबरच या वर्षात ११ नवीन मोठय़ा प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. तर मोठे २१ प्रकल्प या वर्षी पूर्ण होणार आहेत. त्यामुळे सन २०१८ हे मुंबईसाठी प्रकल्पांचे वर्ष ठरणार आहे.

वर्ष २०३४ पर्यंतचा विकास आराखडा मंजूर होणार असून त्याच्या अंमलबजावणीलाही सुरुवात होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प, मलजल प्रक्रिया केंद्र , देवनार क्षेपणभूमी येथे कचऱयापासून वीज निर्मिती प्रकल्प, वस्त्रोद्योग संग्रहालय, कफ परेड येथील सुमारे ३०० एकरांचे हरित उद्यान या नवीन प्रकल्पांचे या वर्षी भूमिपूजन होणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महत्त्वाच्या सुमारे ४० पेक्षा अधिक प्रकल्पांची, कार्यांची यादी तयार करून संबंधित अधिकाऱयांना या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

हे प्रकल्प होणार पूर्ण

विकास नियोजन आराखडा २०३४ – मुंबईचा विकास आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर त्याची अंमलबजावणी याच वर्षीपासून सुरू होणार आहे.

सायकल ट्रॅक – ३९ किलोमीटर लांबीच्या तानसा पाइपलाइनच्या दुतर्फा सायकल ट्रॅक बांधण्याचे काम मे २०१८ मध्ये सुरू होऊन याच वर्षी पूर्ण होणार आहे.

मिठी नदीचे सुशोभीकरण – मिठी नदीच्या किनाऱयांचे सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प यापूर्वीच प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मे २०१८ अखेरपर्यंत काम सुरू होणे अपेक्षित आहे.

लाल बहादूर शास्त्री मार्ग व स्वामी विवेकानंद मार्गांचे रुंदीकरण – लाल बहादूर शास्त्री मार्ग व स्वामी विवेकानंद मार्ग यांच्या रुंदीकरणाचे काम येत्या वर्षी सुरू होऊन पूर्ण होईल.

पाच मंडयांचे पारंपरिक पद्धतीने सुशोभीकरण – यामध्ये सी विभागातील मिर्झा गालिब मंडई, डी विभागातील लोकमान्य टिळक मंडई, जी उत्तर विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई, गोपी टँक मंडई, क्रांतीसिंह नाना पाटील मंडई यांचा समावेश.

डिजिटल शाळांचा व डिजिटल वर्गखोल्यांचा विकास – तसेच शाळांमध्ये ध्वनिक्षेपण यंत्रणा बसविणे. महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांमध्ये येणाऱया रुग्णांची माहिती संगणकीय पद्धतीने माहिती जतन करण्याच्या दृष्टीने ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’ कार्यान्वित करणे.

राजीव गांधी सागरी सेतू’ (वरळी-वांद्रे सी लिंक) ते रंगशारदा मार्ग यांच्यात थेट संपर्क रस्ता तयार करण्याबाबत नियोजनात्मक कार्यवाही.

वांद्रे व माझगावमध्ये भूमिगत वाहनतळ सुविधा तयार करण्याविषयीची कार्यवाही.

या कामांचे भूमिपूजन

‘कोस्टल रोड’ प्रकल्प – कोस्टल रोड हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून वरळी – वांद्रे सागरी सेतूपर्यंतच्या ९.९८ किलोमीटर लांबीच्या सागरी किनारा रस्त्याच्या कामास एप्रिल २०१८ मध्ये सुरुवात होणार आहे.

मलजल प्रक्रिया केंद्र – मलजलावर प्रक्रिया करण्यासाठी वरळी, वांद्रे, धारावी, वर्सावा, भांडुप, घाटकोपर येथे मलजल प्रक्रिया केंद्रे उभारले जाणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ऑगस्ट २०१८ मध्ये कार्यादेश निघतील.

मुलुंड क्षेपणभूमी बंद करणे – मुलुंड क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याच्या कामास वर्ष २०१८ मध्ये सुरुवात होईल.

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता – गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्याचे रुंदीकरण व बांधकामाची कार्यवाही सुरू होईल.

रुग्णालय परिसरातील बांधकामाविषयी – मुलुंडचे एम. टी. अगरवाल रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडीतील पंडीत मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय या रुग्णालयांच्या नवीन इमारतींच्या तसेच बा. य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालय परिसरात १० मजली व ११ मजली इमारतींच्या बांधकामास सुरुवात होईल.

दोन क्रीडा संकुलांची उभारणी – दहिसर मधील भावदेवी मैदान आणि अंधेरीतील वीरा देसाई मार्ग या दोन ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याची कार्यवाही.

देवनार कचराभूमीत कचऱयापासून वीजनिर्मिती प्रकल्प – देवनार क्षेपणभूमीमध्ये जमा झालेल्या कचऱयापासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पाची सुरुवात होईल.

सात नवे तरण तलाव – वरळी, गोवंडी, भांडुप, दहिसर या ठिकाणी प्रत्येकी एक तर अंधेरीमध्ये दोन नव्या तरण तलावांची निर्मिती.

  • Gajanan Tandel

    ५०० चौरस फूटाच्या आतील घरांचा मालमत्ता कर माफीच्या आश्वासनाचे काय ? त्याची पुर्तता कधी होणार ? की पुढच्या पाच वर्षासाठी हे घोंगडे भिजत ठेवणार ? लक्षणे तर तशीच दिसताहेत .