मंठा तालुक्यावर अन्याय खपवून घेणार नाही; शिवसेनेचा इशारा

250

सामना प्रतिनिधी । मंठा

दुष्काळामुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या जालना जिल्ह्यातील सात तालुक्यामधील शेतकऱ्यांना शासनाने दुष्काळ निधी उपलब्ध करून दिला. मात्र या दुष्काळ मदत निधीतून मंठा तालुक्याला वगळल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आम्ही कदापिही खपवून घेणार नाही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी दिला.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी असतानाही मंठा तालुका दुष्काळ निधीतून वगळण्यात आला. शासनाने मंठा तालुक्याचा दुष्काळात समावेश न करणे ही गंभीर बाब असून तालुक्यावर झालेल्या दुजाभावाचे परिणाम शासनाला भोगावे लागतील असा इशारा बोराडे यांनी दिला. जालना जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच अत्यल्प पावसामुळे मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. दुष्काळी परिस्थितीमुळे मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळेल. या आशेवर असलेल्या बळीराजाची घोर निराशा झाली. 2015-16 हंगामातील सोयाबीन पिक विमा वगळण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमुळे मंठा तालुक्यातील बिकट परिस्थितीत असणाऱ्या शेतकऱ्यांना शिवसेना न्याय देणार असून तालुक्यावर झालेला अन्याय शिवसेना कदापि खपवून घेणार नाही. या तालुक्याचा दुष्काळात समावेश करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल वेळप्रसंगी शासकीय कार्यालयाला टाळे ठोकणे, महामार्गावर रास्ता रोको या सारखी आंदोलने करून शासनाला जागे करण्यात येईल, असा इशारा बोराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या